Israel–Hamas war : इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्याच्या तरतूदींसाठी आजपासून वाटाघाटींना सुरुवात करण्यात आली, असे इजिप्तच्यावतीने सांगण्यात आले. पहिला टप्पा संपल्यावर पुन्हा युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली होती. युद्धबंदीचा पहिला टप्पा शनिवारी संपणार असल्यामुळे ही चर्चा लवकरात लवकर पुन्हा सुरू होणे गरजेचे होते.
इस्रायल, कतार आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी कैरोमध्ये युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्यावर सखोल चर्चा सुरू केली, असे इजिप्तच्या सरकारी वृत्तसेवेने सांगितले. प्रदेशातील स्थैर्याला मदत करण्यासाठी आणि जीवनमान उंचावण्याच्या प्रयत्नांचा भाग असलेली मानवाधिकारी मदत कशी उपलब्ध करून द्यावी यावरही चर्चा अपेक्षित आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये युद्ध पूर्ण थांबवणे अपेक्षित आहे. तसेच या टप्प्यामध्ये गाजा पट्ट्यात असलेले इस्रायलचे पूर्ण सैन्य माघारी येणे, हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांचे मृतदेह देखील परत दिले जाणेही अपेक्षित आहे.
इस्रायलच्या मते हमासच्या ताब्यात अजूनही ५९ ओलीस शिल्लक आहेत. त्यांच्यापैकी २४ अजूनही जिवंत असल्याचे मानले जाते आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांचे युद्धाचे उद्दिष्ट या युद्धबंदीच्या करारातून साध्य केले जाणे अवघड आहे.
हमासच्या सरकार आणि लष्करी सामर्थ्याला पूर्ण नामशेष करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. युद्धबंदीच्या प्राथमिक अटीनुसार गाझा पट्ट्यातून इस्रायली सैन्य पूर्ण माघारी घेतले जाणार नाही, असे इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान रात्रभरात हमासने चार ओलिसांचे मृतदेह इस्रायलकडे सोपवले आहेत. इस्रायलने आदलाबदलीच्या तडजोडीचा अखेरच्या टप्प्याचा भाग म्हणून हमासच्या ६०० कैद्यांची सुटका केल्यानंतर हे म-तदेह परत पाठवून देण्यात आले आहेत.