मुंबई : भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरू आहेत. काही राजकीय जाणकारांनी असेही म्हटले आहे की पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात अध्यक्ष पदाची माळ पडणार आहे. तथापि, अधिकृतपणे कोणी याबाबत काही बोलले नाही. खुद्द फडणवीस यांनी मात्र याचा इन्कार केला आहे.
याची सुरूवात झाली ती फडणवीस यांनी त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेंव्हापासून मागच्या रविवारी ते पंतप्रधानांना भेटले होते. तेंव्हापासून चर्चांचा बाजार सुरू झाला आहे. खुद्द फडणवीस यांना याबाबत विचारल्यावर ते म्हणाले की या चर्चा केवळ प्रसारमाध्यमांमधून सुरू आहेत. त्यांनीच याची सुरूवात केली आहे. पंतप्रधानांच्या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले की ही एक शिष्टाचार म्हणून भेट होती. पंतप्रधानांचा महाराष्ट्रावर कायमच आशीर्वाद राहीला आहे.
मी जेंव्हा त्यांची भेट घेतो तेंव्हा मला एक नवीन ऊर्जा आणि मार्गदर्शन मिळते. पंतप्रधानांनी त्यांच्या भेटीसाठी मला बहुमूल्य वेळ दिला हे माझे भाग्य आहे. फडणवीस यांनी स्वत: खुलासा केला असला तरी त्यांचेच नाव भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आघाडीवर असल्याचे म्हटले जाते आहे. त्याशिवाय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याही नावाची चर्चा होते आहे. गेल्या महिन्यापर्यंत महाराष्ट्रातीलच एक नेते विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा होती, आता त्यांचे नाव अचानक मागे पडले असल्याचे दिसते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, भूपेंद्र यादव ही अन्य दोन नावेही स्पर्धेत आहेत.