कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी-राजपक्षे यांच्यात चर्चा

द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत

नवी दिल्ली – जगभरामध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या जीवघेण्या विषाणूची लागण झाल्याने लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत. अद्याप कोरोनाचा अटकाव करण्यात यश न आल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढतच आहे. परिणामी अनेक देशांतील आरोग्य व्यवस्था मोडकळीस आल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

कोरोनाच्या या महासाथीचा सामना करण्यासाठी जगाच्या पाठीवरील बहुतांश देश एकत्र आले असून या संकटसमयी ते एकमेकांना मदत करीत आहेत. कोरोनाविरोधातील या युद्धामध्ये भारताने इतर देशांना मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. अशातच आज कोरोनानाविरोधातील लढ्यामध्ये भारत शेजारील देशांना मदत करण्यास कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्याशी चर्चा करताना केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महासाथीमुळे प्रदेशात निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी भारत श्रीलंकेला मदत करेल असे आश्वासन दिले.

यावेळी झालेल्या संभाषणामध्ये उभय देशांच्या नेत्यांमध्ये भारताच्या पाठबळावर श्रीलंकेत सुरु असलेल्या विकासकामांना गती देण्याची गरज असल्यावर एकमत झाले. श्रीलंकेत भारतीय खाजगी व्यवसायांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या शक्यतेबाबत देखील दोन्ही नेत्यांनी यावेळी चर्चा केल्याचे समजते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.