प्रलंबित अनेक विषयांसाठी घ्यावी लागणार सभा
अंदाजपत्रकाची मुदत संपत आल्याने अडचणीत भर
पुणे – करोनाचे कारण पुढे करत महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मुख्यसभा तहकुबीचा धडका लावला होता. मात्र, मार्चमध्ये अंदाजपत्रक संपत असल्याने तसेच धोरणात्मक निर्णय रखडल्याने डिसेंबरची मुख्यसभा चालवली जाणार आहे.
शहरात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर दि. 21 ते 23 मार्चपर्यंत मुख्यसभा झाल्या. मात्र, त्यानंतर लॉकडाऊनमुळे नंतरच्या सर्व सभा चर्चा न करता तहकूब करण्यात आल्या. तर, या सभा तहकूब न करता शहरातील करोना, त्यावर प्रशासकीय उपाययोजना, आतापर्यंत झालेला खर्च यांवर चर्चेची मागणी विरोधी पक्षांनी वारंवार केली. मात्र, त्यास नकार देत भाजपने या सभा तहकूब केल्या.
मात्र, सभा यापुढेही तहकूब केल्यास अनेक धोरणात्मक निर्णय तसेच निविदा रखडणार आहेत. त्यामुळे डिसेंबरची सभा घेऊन त्यात चर्चा झाली, तरी अनेक प्रस्ताव मान्य करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
शहराचे धोरणात्मक निर्णय तसेच अनेक महत्त्वाचे विषय मुख्यसभेत रखडले आहेत. करोनामुळे या सभा तहकूब करण्यात आल्या होत्या. मात्र, आता त्या घ्याव्याच लागणार आहेत. त्यामुळे नगरसेवक उपस्थित असतील, तरीही आणि ऑनलाइन असतील तरीही या सभा चालवण्याबाबत चाचपणी सुरू आहे.
– धीरज घाटे, सभागृहनेते, मनपा