महापालिकेची फेसबुक पोस्ट ठरतेय चेष्टेचा विषय
पिंपरी – राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील कोविड वॉर रुमला भेट दिली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर उपमुख्यमंत्री पवार यांनी “बाथरुम’ला भेट दिल्याचे इंग्रजीत नमूद करण्यात आले. या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री आणि पालिकेचे अधिकारी चर्चा करत असल्याचा फोटोही पोस्ट केला आहे.
या पोस्टवर अल्पावधीतच अनेक कमेंटचा पाऊस पडला. नेटकऱ्यांनी तिरकस शेरेबाजी करत खरपूस समाचार घेतला. दरम्यान, हा संदेश मराठीतच टाकला होता, मात्र त्याचे इंग्रजीमध्ये चुकीचे भाषांतर झाले असल्याची सारवासारव पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. महापालिका “सोशल मीडिया एक्सपर्ट’वर दर महिन्याला हजारो रुपये बदनामी करण्यासाठी खर्च करते का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.
महापालिका दिवसभराच्या घडामोडींची माहिती अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड करत असते. त्यातून नागरिकांना आज शहरात काय घडले याबाबत माहिती मिळते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महापालिकेच्या वॉररुमला भेट दिली. तिथे त्यांनी शहरातील करोनाबाबतची माहिती जाणून घेतली. याची माहिती महापालिका प्रशासनाने फेसबुक पेजवर टाकली. ही माहिती टाकताना मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांचा वापर करण्यात आला. मराठीत टाकलेली माहिती बरोबर आहे. मात्र इंग्रजीमध्ये टाकलेल्या माहितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या “बाथरुम’ला भेट दिली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ही चूक आयुक्तांच्याही लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ चूक दुरुस्त करण्याचे आदेश दिले. मात्र तोपर्यंत अनेकांनी स्क्रीनशॉट घेत महापालिका प्रशासनाची ही चूक सोशल मीडियावर व्हायरल केली होती.