बंगळुरू – भाजपने पाच महिन्यांपूर्वी कर्नाटकात मुख्यमंत्री बदल केला. आता त्या राज्यात पुन्हा नेतृत्वबदलाच्या चर्चांना तोंड फुटले आहे. अर्थात, भाजपच्या विविध नेत्यांकडून त्या चर्चा म्हणजे अफवा असल्याचा दावा करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याच एका वक्तव्यामुळे कर्नाटकात पुन्हा नेतृत्वबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. एका कार्यक्रमात बोलताना बोम्मई भावुक झाले. कुठलेही पद कायमस्वरूपी नसते याची मला पूर्ण जाणीव आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
त्यातून भाजप नेत्यांना नेतृत्वबदलाविषयीच्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत आहेत. अशाच एका प्रश्नाला उत्तर देताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी नेतृत्वबदलाची शक्यता फेटाळून लावली. कर्नाटकमध्ये पुढील विधानसभा निवडणूक 2023 मध्ये होईल.
तोपर्यंत बोम्मईच मुख्यमंत्री असतील. राज्याच्या राजकारणात संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि भाजप सरकारला बदनाम करण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामागे कारस्थान असावे.
अफवा पसरवण्यात कॉंग्रेसचा हात असू शकतो, असे त्यांनी म्हटले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही नेतृत्वबदलाचा इन्कार केला. मी नेहमी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात असतो. कर्नाटकात कुठल्या बदलाचा विचार असता तर मला समजले असते, असे उत्तर जोशी यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर दिले.