आठ देशाच्या राजदूतांनी घेतला पुराचा आढावा
मुंबई : कोल्हापुर, सातारा आणि सांगलीच्या पुराची माहिती ही देशातच नाही तर परदेशापर्यंत जावून पोहचली आहे. कारण या पुराची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राज्यातील पुराचा आढावा घेण्यासाठी ब्राझील, पोलंडसह 8 देशांच्या राजदूतांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. संभाजीराजे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ब्राझील, जर्मनी, कॅनडा, पोलंड, बल्गेरिया, स्पेन, नॉर्वे आणि ट्युनेशिया या देशांच्या राजदुतांनी महापुराविषयी आणि बचावकार्याची माहिती जाणून घेतली.
राज्यातील महापूराची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर या सर्व देशांच्या राजदूतांनी पुरग्रस्त भागाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली. दरम्यान, आपले आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले संबंध निर्माण झाले आहेत तसेच याचा फायदा आगामी काळात महाराष्ट्राला मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही यावेळी संभाजीराजे यांनी म्हटले आहे.