धनंजय घोडके
वाईत उपसभापतिपदासाठी डोंगरे-भोसले यांच्यात चुरस
आरक्षणाच्या विरोधात राष्ट्रवादी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणार दाद
वाई – वाई पंचायत समितीच्या सभापती पद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. सध्या वाई पंचायत समितीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असून पाचवड गणातील एकमेव संगीता चव्हाण या ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवार असल्याने सभापती पद हे त्यांनाच मिळणार हे निश्चित झाल्याचे मानले जात आहे. मात्र आता खरी चुरस लागली आहे ती उपसभापती पदासाठी. दरम्यान, अभेपुरी गणातील विक्रांत डोंगरे आणि ओझर्डे गणाती मधुकर भोसले या दोघांपैकी नेमके कोणाच्या गळ्यात उपसभापती पदाची माळी आमदार मकरंद पाटील टाकणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, हे आरक्षण बदलून मिळावे यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात येणार असून तशी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.सध्या वाई पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असून सहा सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. यामध्ये सौ. रजनीताई सुधीर भोसले, मधुकर आनंदा भोसले, अनिल जगताप, पै. विक्रांत विठ्ठल डोंगरे, सौ. सुनिता संजय कांबळे, सौ. संगीता मोहन चव्हाण यांचा समावेश आहे. तर कॉंग्रेसच्या दोन सदस्यांपैकी दीपक ननावरे या एका सदस्याने भाजपमध्ये प्रवेश केला असून सौ. ऋतुजा शिंदे या एकमेव महिला सदस्या कॉंग्रेसमध्ये आहेत.
पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुमत असून सभापती, उपसभापती पदावर त्यांचीच वर्णी लागणार आहे. सभापती पदासाठी नवीन पडलेल्या आरक्षणामुळे नागरिकांचा प्रवर्ग महिलांसाठी (ओबीसी) राखीव असल्याने पाचवड गणाला सभापती पदाचा मान मिळण्याची दाट शक्यता आहे. या गणातून राष्ट्रवादीच्या सौ. संगीता चव्हाण यांची वर्णी या पदासाठी लागणार आहे. सभापती पदासाठी ओबीसी महिला संगीता चव्हाण या एकमेव असल्याने त्यांना संधी प्राप्त झाली आहे. तर उपसभापती हे पद लोकप्रतिनिधींच्या मर्जीवर दिले जात असल्याने आ. मकरंद पाटील यांच्या मर्जीतील नावालाच प्रथम पसंती मिळणार आहे.
दरम्यान, केंजळ गणातील अनिल जगताप यांनी संधी मिळाली असल्याने आता अभेपुरी गणातून निवडून आलेले विक्रांत डोंगर आणि ओझर्डे गणातून निवडून आलेले मधुकर भोसले या दोघांची नावे उपसभापती पदासाठी चर्चेत आहेत. दरम्यान, पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडी अंतिम तारीख 21 डिसेंबर पर्यंत असून त्यानंतर सभापती व उपसभापती निवड करण्यात येणार आहेत.