‘पुणे झेडपी पॅटर्न’ची देशभरात चर्चा

आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका खरेदी करून देणारी एकमेव जिल्हा परिषद

पुणे -वित्त आयोगाच्या निधीचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका खरेदी करून देणारी पुणे जिल्हा परिषद ही राज्यातच नव्हे तर देशात एकमेव ठरली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या “पुणे झेडपी पॅटर्न’नुसार ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ उपचार मिळावे यासाठी एकाचवेळी 51 रुग्णवाहिका खरेदी करण्याच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक झाले आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाबाधितांना ऑक्‍सिजनने सज्ज अद्ययावत रुग्णवाहिका ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्याचा पुणे जिल्हा परिषदेच्या प्रयोगाची देशभर चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील भंडारा, नगर, उस्मानाबाद या जिल्ह्यांसह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यांतूनही याबाबतची माहिती घेतली जात असल्याने रुग्णवाहिका खरेदीचा “पुणे झेडपी पॅटर्न’ देशभर पोहोचला आहे.

ग्रामीण भागात बाधित रुग्णांना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालय अथवा तालुक्‍याच्या ठिकाणच्या रुग्णालयात पोहोचण्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिकेची गरज असते. श्‍वासोच्छवास घेण्यासाठी अडचण झाल्यास त्यावेळी ऑक्‍सिजनने सज्ज रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे रुग्णालयात वेळेत पोहोचण्यास रुग्णांना अडचणी येत होत्या. पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील ही अडचण ओळखून चौदा आणि पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदांना मिळणाऱ्या अनुदानातून रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव पुढे ग्रामपंचायतींनी स्वीकारला. पुणे जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्या प्रत्येक केंद्रांसाठी एक ऑक्‍सिजनने सज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची ही योजना आहे. यामुळे करोनाच्या साथीच्या काळात तसेच कायमस्वरुपी त्या-त्या भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध होईल, असा या योजनेमागचा हेतू आहे.

ग्रामपंचायतीचीच मालकी…
करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ग्रामपंचायतीच्या 14व्या वित्त आयोग निधीतून रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांची मालकी ही ग्रामपंचायतींचीच राहणार आहे. त्याबाबत ग्रामपंचायतींच्या दप्तरी याची नोंद घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत.

जिल्ह्यातील 96 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी 90 आरोग्य केंद्रांना या रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत अद्ययावत 51 रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या असून, त्या पीएससीला पाठविले आहे. तर अन्य रुग्णवाहिका लवकरच खरेदी केल्या जातील. पुणे जिल्हा परिषदेच्या रुग्णवाहिकेच्या पॅटर्नची आता अन्य जिल्ह्यांनी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.