भाजपाला मदत करण्यासाठीच दाऊदच्या समर्पणाबाबतची चर्चा : नवाब मलिक यांचे प्रत्युत्तर

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचे प्रत्यार्पण रखडले, या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपाला राष्ट्रवादीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांनी यासंदर्भात आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली असतानाच आता निवडणूकीच्या तोंडावर भाजपला मदत करण्यासाठी वारंवार ही चर्चा समोर आणली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक म्हणाले, गेली 25 वर्षे दाऊदला का भारतात आणले नाही ही चर्चा करण्यात येत आहे. परंतु शरद पवारांनी आपली स्पष्ट भूमिका यावर मांडलेली आहे. जो आरोपी फरारी आहे अशा आरोपीला शर्तीवर “सरेंडर’ केले जात नाही. त्यावेळी सरकारने मान्यता दिली नाही.

ज्या अटी राम जेठमलानी सांगत होते, त्या सरकारला मान्य नव्हत्या. त्याबाबत शरद पवाररांनी वारंवार खुलासा केला आहे. राम जेठमलानी जर सच्चे देशभक्त होते तर त्यांनी दाऊदला भेटल्यानंतर इंटरपोलला का माहिती दिली नाही. राम जेठमलानी केंद्रीय मंत्री झाले. राज्यात भाजपचे आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. अशावेळी दाऊदला “सरेंडर’ करुन का घेतले नाही. त्यांनी या सरकारशी चर्चा का केली नाही, असे सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केले.

प्रकाश आंबेडकर हे 25 वर्षानंतर हा प्रश्न काढत आहेत, असे सांगतानाच आज जो प्रश्न निर्माण करण्यात आला तो कुणासाठी, कुणाला मदत करण्यासाठी आहे असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला. आता वंचित आघाडीचे नेते बी. जी. कोळसे-पाटील हे सांगत आहेत कि, वेगळी निवडणूक लढणे म्हणजे भाजपला आणि संघाला मदत करण्यासारखे आहे, असे असताना प्रकाश आंबेडकर स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. याकडेही मलिक यांनी लक्ष वेधले.

Leave A Reply

Your email address will not be published.