दिल्लीतील हातमिळवणीसाठी कॉंग्रेस-आपमध्ये चर्चा सुरू

अनिश्‍चिततेचे सावट संपवून आघाडीच्या दिशेने कूच
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत आघाडी करण्याच्या दृष्टीने कूच करताना कॉंग्रेस आणि आप या पक्षांनी अनिश्‍चिततेचे सावट संपवल्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्षांनी हातमिळवणी करण्यासाठी जागावाटपाच्या सुत्रावर चर्चा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

मागील काही दिवसांपासून कॉंग्रेस आणि आपमधील संभाव्य आघाडीबाबत विसंगत बातम्या येत होत्या. आपशी हातमिळवणी करण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभिन्नता असल्याचेही समोर आले. त्यामुळे संभाव्य आघाडीवर अनिश्‍चिततेचे सावट पसरले असतानाच बुधवारी आपचे खासदार संजय सिंह आणि दिल्ली कॉंग्रेसचे प्रभारी पी.सी.चाको यांची बैठक झाली. त्या बैठकीत जागावाटपाविषयी चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. दिल्लीत लोकसभेच्या एकूण 7 जागा आहेत. त्यातील 3 जागा लढवण्याची कॉंग्रेसची इच्छा आहे. तर आपने कॉंग्रेससाठी 2 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. आपच्या प्रस्तावाची माहिती चाको कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देणार आहेत. येत्या काही दिवसांत राहुल अंतिम निर्णय घेतील, असे सुत्रांनी नमूद केले. मागील निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सातही जागा जिंकल्या. आप आणि कॉंग्रेसला मिळून भाजपपेक्षा अधिक मते मिळाली. मात्र, त्यांच्यातील मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला. ते मतविभाजन टाळून भाजपला बॅकफुटवर नेण्यासाठी आघाडी करण्याची गरज कॉंग्रेस आणि आपला पटली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.