सातारा, (प्रतिनिधी)- साताऱ्यात आयटी पार्क उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाबरोबर प्रयत्न सुरु असून इन्फोसिसच्या माध्यमातून साताऱ्यात आयटी कंपनी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करू, इन्फोसिसने आयटी क्षेत्राशी संबंधित केंद्र साताऱ्यात उभारावे,
अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी इन्फोसिस फाऊंडेशनच्या संस्थापिका व राज्यसभेच्या खासदार डॉ. सुधा मूर्ती यांच्याकडे केली. प्रकल्प उभारण्यात सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य ती मदत करण्याचे आश्वासन डॉ. सुधा मूर्ती यांनी दिले.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी खासदार डॉ. सुधा मूर्ती यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी याताऱ्यात आयटीपार्क उभारण्याच्यादृष्टीने त्यांची चर्चा झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देऊन डॉ. मूर्ती यांचे स्वागत करण्यात आले.
महिलांचे आरोग्य, जागतिक वारसास्थळे, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड, दुर्ग व देशांतर्गत पर्यटन या मुद्द्यांचा उल्लेख संसदेतील पहिल्याच भाषणात सुधा मूर्ती यांनी केला.
त्याबद्दल उदयनराजे भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. मूर्ती म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय कमी कालावधीत रयतेचे राज्य निर्माण केले. जगाला हेवा वाटावा असे अनेक पराक्रम केले. लोकशाहीचा पाया रचला. त्यांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे कार्य आपण केले पाहिजे.
मूर्ती दाम्पत्याच्या इन्फोसिस कंपनीने देशाच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. साताऱ्यात आयटी पार्क उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाबरोबर सुरू असलेल्या प्रयत्नांची कल्पना यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांना दिली.
इन्फोसिसच्या माध्यमातून साताऱ्यात आयटी कंपनी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासित करून इन्फोसिसने आयटी क्षेत्राशी संबंधित केंद्र साताऱ्यात उभारण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
तसेच साताऱ्याला भेट देण्याचे आमंत्रण उदयनराजे यांनी त्यांना दिले. प्रकल्प उभारण्यात सकारात्मक प्रतिसाद देवून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन डॉ. सुधा मूर्ती यांनी दिले.
यावेळी प्रतापगड प्राधिकरणचे सदस्य चंद्रकांत पाटील, सोमनाथ धुमाळ, छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सदस्य संग्राम बर्गे, ॲड. विनित पाटील, संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.