नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी हे अजूनही ठाम आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी आज अहमद पटेल आणि के सी वेणुगोपाल या पक्षाच्या दोन प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली त्यावेळी माझ्या ऐवजी दुसरा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करा असा आदेश त्यांनी या प्रतिनिधींना दिला असल्याचे सांगण्यात येते. तसेच गांधी घराण्याशिवाय अध्यक्ष सुचवा, गांधी घराण्यातला नको, असं खुद्द राहुल यांनी सांगितलंय.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून काँग्रेस नेते आणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव शर्यतीत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटेनी, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याही नावाचा समावेश आहे. याबाबत राहुल गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीने पक्षांतर्गत बदलासाठी पूर्ण अधिकार दिले आहेत.
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीतच राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. पण पक्षाने त्यांचा राजीनामा एकमताने फेटाळला आहे. तथापी राहूल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद अजून सोडलेले नाही. पक्षाला नवीन अध्यक्ष शोधण्यासाठी काही वेळ देण्याची त्यांची तयारी आहे. पण अध्यक्षपदावर मात्र आता ते राहु इच्छित नाहींत हे जवळपास निश्चीत मानले जात आहे.