केंद्रीय नेत्यांशी चर्चा करून सरकार स्थापनेविषयी निर्णय घेऊ – येडियुरप्पा

आम्ही राजकारणातील लोक संन्यासी नसतो

बंगळुरू – कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस पक्षाच्या अकरा आमदारांचे राजीनामे सादर करण्यात आल्यानंतर राज्य सरकार अस्थिर झाले असून राज्यात पर्यायी सरकार स्थापन करण्याविषयी आम्ही केंद्रीय नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे भारतीय जनता पक्षाचे नेते बी.एस येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की आम्ही एखाद्या राजकीय पक्षात आहोत. याचा अर्थ सरकार स्थापनेचा दावा न करण्याइतके आम्ही संन्यस्थ वृत्तीचे आहोत असे समजण्याचे कारण नाही. आम्ही संन्यासी नाही त्यामुळे आम्ही सरकार स्थापनेचा दावा करू शकतो असे त्यांनी आज एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

आता राज्यातील विद्यमान आघाडी सरकार कोसळेल काय असे विचारता ते म्हणाले की आम्ही या विषयी सध्या वेट ऍन्ड वॉच अशी भूमिका घेतली आहे. विधानसभेचे सभापती रजेवर असताना त्यांच्या कार्यालयात अकरा आमदारांनी राजीनामे सादर केले आहेत. त्याविषयी सभापतींनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यावर सोमवारी निर्णय घेतला जाईल असे सभापतींनी म्हटले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी कुमार स्वामी हे सध्या अमेरिकेच्या खासगी दौऱ्यावर असून प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडुराव हेही राज्याच्या बाहेर आहेत.

राज्यातील नव्या घडामोडी लक्षात घेऊन हे दोन्ही नेते बंगळुरू कडे परत निघाले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी या पेचप्रसंगात लक्ष घातले आहे. कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचे एकूण 118 आमदार होते त्यांच्यापैकी चौदा आमदारांनी राजीनामे दिले आहेत असे सांगण्यात येते. त्यामुळे राज्यातील या आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या आता केवळ 105 इतकी राहिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.