भारतीय वनसर्वेक्षण संस्थेच्या शास्त्रज्ञांचे पश्चिम घाट क्षेत्रात केरळमध्ये संशोधन
पुणे – जैवविविधतेचे हॉटस्पॉट असलेला पश्चिम घाट म्हणजे असंख्य नैसर्गिक घटकांचा खजिनाच आहे. विविध प्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पतींच्या नवनवीन प्रजाती येथे सापडतात. याच खजिन्यातील आणखी एक रत्न वनस्पती शास्त्रज्ञांना सापडले असून, ऑर्किडच्या एका नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. या नवीन प्रजातीचे “हबेनेरिया अगस्त्यामलाइना’ असे नामकरण करण्यात आले आहे.
भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयाने पश्चिम घाटात वनस्पतींबाबत शोध आणि संशोधन केले जाते. संस्थेतील शास्त्रज्ञांनी देशभरातील ऑर्किड वनस्पतींबाबत सर्वेक्षण केले आहे. यादरम्यान त्यांना ऑर्किडच्या दोन नवीन प्रजाती सापडल्या. यातील एक लोणावळा येथील कोराईगडजवळ आढळली असून दुसरी केरळमधील कोलम जिल्ह्यातील अगस्त्यामलई बायोस्फेअर रिझर्व्ह या राखीव वनक्षेत्रात सापडली आहे. संस्थेतर्फे डॉ. जीवन जलाल, डॉ. जे. जयंथी आणि सुरेशकुमार पी. यांनी या वनस्पतीचा शोध लावला आहे. अगस्त्यमलाई बायोस्फिअर रिझर्व्ह येथे सापडल्यानेच या वनस्पतीचे “हबेनेरिया अगस्त्यामलाइना’ असे नामकरण केल्याचे डॉ. जलाल यांनी सांगितले. नुकतेच यासंदर्भातील शोधनिबंध “लंकेस्टेरिऍना’ या वनस्पतीशास्राशी निगडित नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
याबाबत डॉ. जलाल म्हणाले, “पश्चिम घाट महाराष्ट्रापासून केरळपर्यंत पसरलेला आहे. या भागातील ऑर्किडबाबत गेले अनेक दिवसांपासून काम केले जात आहे. याच अभ्यासादरम्यान या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. केवळ पश्चिम घाटातच नव्हे, तर देशातील बहुसंख्य ठिकाणी दुर्मिळ प्रजातीतील, नावीन्यपूर्ण अशा वनस्पती आढळतात. मात्र, अनेकदा त्यांची नोंद होत नसल्याने त्यांची माहिती उपलब्ध होत नाही.’
संभाव्य धोका : “हबेनेरिया अगस्त्यामलाइना’ ही वनस्पती रोजेमला या गावाला जाण्याऱ्या मार्गावर उगवते. केवळ 1 चौरस मीटर इतक्या छोट्या क्षेत्रात उगवणाऱ्या या वनस्पतीला संभाव्य रस्ते रुंदीकरणामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे.
“हबेनेरिया अगस्त्यामलाइना’ वनस्पतीची वैशिष्ट्ये
ऑर्किड प्रजातीची वनस्पती
रंग-पांढरा
उंची – 35-40 सें.मी.
एकाचवेळी 8 ते 11 फुले येतात.
फुलांचा कालावधी – ऑक्टोबर महिना