सवलतीच्या दरात जेवण देणारी सुविधा बंद?

मेट्रोसाठी मंडईतील झुणका भाकर केंद्र हलविणार : महामेट्रोकडून पालिकेकडे जागेची मागणी

पुणे – मंडई येथील मेट्रो स्थानकाच्या कामासाठी या ठिकाणी असलेले झुणका-भाकर केंद्रही बंद होणार आहे. या केंद्राच्या जागेची मागणी महामेट्रोने महापालिकेकडे केली आहे. त्यामुळे स्वारगेट पाठोपाठ कष्टकऱ्यांना सवलतीच्या दरात जेवण देणारी ही सुविधाही बंद होणार आहे. दरम्यान, या केंद्रास महापालिकेकडून पर्यायी जागा शोधण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

महामेट्रोचे मंडई येथे स्थानक असणार आहे. हे स्थानक भूयारी असले तरी, स्थानकातून बाहेर येण्यासाठी तसेच आत जाण्यासाठीच्या सुविधांसाठी मेट्रोला शिवाजी रस्ता तसेच मंडईच्या परिसरातील जागा हव्या आहेत. त्यात महात्मा फुले मंडईच्या परिसरात असलेले हे झुणका भाकर केंद्र अडथळा ठरत आहे. त्यामुळे महामेट्रोकडून महापालिकेकडे हे केंद्र काढून ती जागा देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, महापालिकेकडूनही हे केंद्र हटविण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. मंडई परिसरात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे कष्टकरी वर्गाची संख्या या भागात मोठ्या प्रमाणात असून त्यांना या केंद्रात अल्पदरात जेवण उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे या ठिकाणी मोठी वर्दळ असते. तसेच याचा लाभही रिक्षाचालक, हमाल तसेच भाजी विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्यांना होतो. मात्र, आता मेट्रोसाठी या केंद्रावर कुऱ्हाड पडणार आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच महापालिकेकडून स्वारगेट येथील ट्रान्सपोर्ट हबच्या कामासाठी या ठिकाणी असलेले झुणका भाकर केंद्र हलविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानंतर आता मंडई येथील केंद्रही मेट्रोसाठीच बंद होणार असल्याने कष्टकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

पर्यायी जागा देणार?
हे केंद्र मेट्रोसाठी काढण्यात येणार असले तरी, त्यासाठी पर्यायी जागा देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. या केंद्राचा वापर तसेच नागरिकांची गरज लक्षात घेऊन त्यासाठी पर्यायी जागा शोधण्यात येत असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र, काही दिवसांपूर्वीच स्वारगेट येथील केंद्र काढण्याचा निर्णय झाल्यानंतर पुनर्वसन अतिक्रमण विभागाने करायचे की मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून यावरून वाद सुरू असल्याने त्याबाबत काहीच निर्णय झालेला नाही अशा स्थितीत आता हे दुसरे केंद्रही त्याच स्थितीत असल्याने महापालिका नक्‍की पर्यायी जागा देणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)