शहर ‘भाजपा’त अस्वस्थता

अजित पवारांची धास्ती; पालिकेतील कामांच्या चौकशीची चिंता

पिंपरी – राज्यातील सत्तास्थापनेकडे लक्ष देऊन असलेल्या शहरातील सत्ताधाऱ्यांमध्ये आज अस्वस्थता पहायला मिळाली. भाजपाने सत्तास्थापनेस नकार दिल्यामुळे सत्तास्थापनेची सूत्रे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हाती गेल्यामुळे भाजपाचे सरकार स्थापन होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. शासन कोणाचे येईल यापेक्षा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धास्ती असून “चौकशीचा फेरा’ आपल्या मागे लागणार की काय? अशी “चिंता’ पालिकेतील पदाधिकाऱ्यांना वाटू लागली आहे.

सन 2014 पूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. मात्र राष्ट्रवादीतून फुटून भाजपामध्ये गेलेल्या आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी महापालिकेत 2017 साली सत्ता परिवर्तन घडवून आणले. हक्काची महापालिका विकासकामे केल्यानंतरही गेल्यामुळे अजित पवारांनी त्यावेळी नाराजी व्यक्त केली होती. मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपामुळे अजित पवार यांना केवळ नाराजी व्यक्त करण्याव्यतिरिक्त काहीच करता आले नव्हते. तत्कालीन परिस्थितीत राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना धडा शिकवू इतकेच वक्तव्य पवारांनी केले होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाची सत्ता येणार या खात्रीमुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मनमानी पद्धतीने गेल्या अडीच वर्षांपासून कारभार सुरू ठेवला होता. या कारभाराविरोधात राज्य शासनाकडे अनेक तक्रारी करूनही त्याची दखल कोणीच घेतली नव्हती. भविष्यातील सरकारही भाजपाचे असल्याने पुढेही कोणी दखल घेण्याची शक्‍यता नव्हती. मात्र निकालानंतरचे चित्र बदलले आणि आज (रविवारी) भाजपाची सत्ता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहर भाजपाच्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

गेल्या अडीच वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून सुमारे दहा हजार कोटींची शहरात विकासकामे केली गेली आहेत. याकामांमध्ये अनागोंदी, भ्रष्टाचार झाल्याचे वारंवार आरोप झाले मात्र “तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या तत्वाने हा प्रकार बाहेर येऊ दिला गेला नाही. आता राज्यातील सत्तेत राष्ट्रवादीचा सहभाग असणार हे रविवारी स्पष्ट झाल्यामुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी अजित पवारांचा धसकाच घेतल्याचे दिसून येत आहे.

चौकशीचा ससेमिरा लागणार का?
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे “कारभारी’ म्हणून अजित पवार यांनी तब्बल 15 वर्षे एकहाती गाडा हाकला होता. शहरातील कानाकोपऱ्यासह महापालिकेची खडान्‌खडा माहिती त्यांना आहे. ठेके देण्यापासून कामकाजाच्या पद्धतीपर्यंत अत्यंत सूक्ष्म लक्ष महापालिकेत पवारांचे होते. गेल्या अडीच वर्षांत हजारो कोटींची कामे शहरात झाली आहेत. या कामांबाबत नगरविकास विभागाकडे अनेक तक्रारी गेल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेतील कामांच्या चौकशीचा ससेमिरा अजित लावणार का? याची चर्चा शहरात रंगली आहे.

सोशल मीडियावरही भाजपविरोधाला जोर
राज्यात भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट होताच शहरातील सोशल मीडियावर भाजपा विरोधी पोस्टचा जोर वाढला होता. विशेष म्हणजे भाजपाच्या काही नगरसेवकांनीही यामध्ये सहभाग घेत स्वपक्षावर हल्ला चढविला. हा हल्ला चढविताना महापालिकेतील मनमानी कारभारावरही आसूड ओढण्यात आले.

महापालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता?
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाकडून नगरसेवक म्हणून विजयी झालेले पूर्वाश्रमीचे ते राष्ट्रवादीचेच आहेत. यातील अनेक नगरसेवक “राष्ट्रवादी’चा कारभार बरा होता, असे म्हणत विधानसभा निवडणुकीत आपल्याच नेत्यांच्या विरोधात उतरले होते. स्थानिक नेत्यांच्या विरोधात गेलेल्या नगरसेवकांची संख्या 12 ते 15 च्या घरात आहे. महापालिकेत सत्ता आणण्यासाठी 65 चे संख्याबळ आवश्‍यक आहे. भाजपातील नाराजांना सोबत घेतल्यास राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनेला बळ येऊ शकते. विशेष म्हणजे राज्यात शिवसेनेसोबत राष्ट्रवादी राहण्याची शक्‍यता असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तास्थापनेसाठी शिवसेना राष्ट्रवादीसोबत गेल्यास बहुमताचा जादुई आकडा राष्ट्रवादीला सहज गाठता येणे शक्‍य आहे. त्यामुळे भाजपातील नाराज आणि शिवसेनेला सोबत घेऊन महापालिकेत सत्ता परिवर्तन होण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here