वुहान: करोना व्हायरसच्या फैलावाचे मुख्य केंद्र असलेले वुहान आता पूर्वपदावर आले आहे. तसेच व्यापार, वाहतूक सुरु झाली आहे. मात्र, वुहानमध्ये लॉकडाऊन संपल्यानंतरही नागरिकांमध्ये अस्वस्थतता कायम आहे. वुहानमधल्या छोट्या दुकानदारांनी भाडेमाफीसाठी निदर्शने केली आहेत.
लॉकडाऊननंतर वुहानमध्ये आंदोलन झाल्याची ही पहिली घटना आहे. वुहानमध्ये तोंडाला मास्क बांधून, हातात घोषणांचे फलक घेऊन या दुकानदरांनी शुक्रवारी मॉलबाहेर निदर्शने केली. वर्षभराचे भाडे माफ करावे या मागणीसाठी दुकानदारांनी घोषणाबाजी केली.
आम्ही जगू शकत नाही. जागेच्या मालकाने सुरक्षा डिपॉझिटपोटी घेतलेली रक्कम आणि भाडे परत करावे अशी एका महिलेने मागणी केली आहे. ग्रॅंड ओशन डिपार्टमेन्ट स्टोअरमध्ये तिचे दुकान आहे. आंदोलन करणारे 99 टक्के छोटे दुकानदार असून भाडे माफी आमची मुख्य मागणी असल्याचे या महिलेने सांगितले. करोना व्हायरसमुळे व्यवसाय ठप्प असल्याने हातामध्ये पैसा नाही, असे या आंदोलकांचे म्हणणे आहे.
आमच्या आंदोलनानंतर सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. मात्र, आम्हाला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. वुहानमधून जगभरात करोना व्हायरसचा फैलाव झाला. त्यामुळे 23 जानेवारीपासून वुहान पूर्णपणे बंद होते. वुहानच नाही तर हुबेई प्रांतातही हिंसक चकमकी झाल्या आहेत.