विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय
कार्यालयात वेळेवर यावे, प्रकरणे प्रलंबित न ठेवण्याचा इशारा
पुणे – पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर यावे व कोणतीही प्रकरणे प्रलंबित ठेवू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवीन सहसंचालकांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला आहे. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
राज्यामधील पुणे विभागीय कार्यालय हे एक महत्त्वाचे कार्यालय आहे. यातील कामाचा व्यापही मोठा आहे. वरिष्ठ महाविद्यालयांची विविध प्रकरणे या ठिकाणी दाखल होत असतात. गेल्या काही वर्षांत या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी, मनमानी कारभार वाढला आहे. प्रकरणे मुदतीत मार्गी लागत नाहीत, यामुळे या कार्यालयात महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी यांची सतत गर्दी होत असल्याचे अनेकदा पहायला मिळते.
कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कधीही येतात अन् कोणत्या तरी निमित्ताने गायब होतात. हे सर्व कार्यालयात कमी अन् बाहेरच जास्त असतात. प्रत्येक अधिकाऱ्यांचे टेबल फायलिंनी भरलेले आढळतात. त्यांच्याकडून संबंधितांना बऱ्याचदा उडवाउडवीची उत्तरेही देण्यात येतात. आर्थिक “वजन’ ठेवल्याशिवाय प्रकरणे मार्गी लागत नाही, असेही काही जणांकडून समजले आहे.
आता या विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकपदाची सूत्रे डॉ. मोहन खताळ यांनी स्वीकारली आहेत. त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. कार्यालयातील कामकाज पद्धतीत सुधारणा करण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करण्यात येऊ लागली आहे. 3 महिने बंद असलेले बायोमेट्रिक मशीनही तत्काळ दुरुस्त करण्यात आले आहे. कार्यालयातील स्वच्छता व टापटीपपणालाही महत्त्व देण्यात येऊ लागले आहे. कारभारात सकारात्मक सुधारणा करण्याच्या सक्त सूचनाही अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.