करोनाविरुद्धच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटलची नेत्रदीपक कामगिरी
कराड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील नवनव्या ठिकाणी रोज करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याच्या बातम्यांमुळे भयग्रस्त झालेल्या कराड तालुकावासीयांसाठी दिलासा देणारी बातमी शुक्रवारी मिळाली. कृष्णा हॉस्पिटलमधून सहा करोनामुक्त रुग्णांना सोडण्यात आले. त्यामध्ये 87 वर्षांच्या वृद्धाचा आणि तीन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून आतापर्यंत एकूण 12 करोनामुक्त रुग्णांना सोडण्यात आले आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत या हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या नेत्रदीपक कामगिरीचे कौतुक होत आहे.
आगाशिवनगर येथील 87 वर्षांची वृद्ध व्यक्ती, मूळचा कडेगाव तालुक्यातील येतगाव येथील व सध्या आगाशिवनगरात राहणारा 33 वर्षांचा युवक, वनवासमाचीतील तीन वर्षांचे मूल व 57 वर्षांचे गृहस्थ, रेठरे बुद्रुक येथील 42 वर्षांचे गृहस्थ आणि वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील 48 वर्षांचे गृहस्थ यांना 23 एप्रिलला दाखल करण्यात आले होते. त्यांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर विशेष करोना वॉर्डमध्ये उपचार सुरू होते.
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टर्स करत असलेल्या उपचारांमुळे आणि नर्सिंग स्टाफ घेत असलेल्या विशेष काळजीमुळे कृष्णा हॉस्पिटलमध्ये करोनाग्रस्त रुग्ण बरे होणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या आधी हॉस्पिटलमधून तांबवे, म्हारुगडेवाडी, डेरवण, ओगलेवाडी, बाबरमाची, चरेगाव येथील सहा करोनाबाधितांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. कृष्णा हॉस्पिटलमधील डॉक्टर व नर्सिंग स्टाफने यशस्वी उपचारांमध्ये सातत्य राखल्याने शुक्रवारी आणखी सह जण करोनामुक्त झाले. त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.
डॉ. सुरेश भोसले यांनी या करोनामुक्त रुग्णांचे विशेष अभिनंदन केले. कृष्णा हॉस्पिटलमध्ये 40 हून अधिक करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. बऱ्यायशा रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. भविष्यात दुर्दैवाने रुग्णसंख्या वाढल्यास त्यांना सामावून घेऊन, उपचार करण्यास आमची यंत्रणा सक्षम आहे, असे डॉ. भोसले यांनी सांगितले. हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी.पाटील, डॉ. एस. आर. पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख उपस्थित होत्या.
वयाच्या 87 व्या वर्षापर्यंत मला कसला आजार नव्हता की, कसली गोळी सुरू नव्हती; पण करोना संसर्गामुळे इतके दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं. या 15 दिवसांत कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह सर्वांनी मला बरं करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी केलेल्या या सेवेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
प्रयोगशाळेत कोव्हिड-19 चाचण्यांना प्रारंभ…
नवी दिल्लीतील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानकडून कृष्णा हॉस्पिटलला कोव्हिड-19 च्या चाचण्या करण्याची परवानगी काही दिवसांपूर्वी मिळाली. या हॉस्पिटलमधील प्रयोगशाळेत गेल्या दोन दिवसांपासून या चाचण्यांना प्रारंभ करण्यात आला आहे. कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या “मॉलेक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक्स’ विभागामार्फत या चाचण्या केल्या जात आहेत. दररोज किमान 40 जणांच्या स्रावांच्या चाचण्या करण्याची क्षमता आहे.