करोना 22 हजारांच्या पार : नवीन 903 रुग्णांची भर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 22 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर एकाच दिवशी तब्बल 2107 रुग्णांना डिस्चार्ज देत नवीन उच्चांक गाठला आहे. उल्लेखनीय बाब अशी की आजवर शहरात कधीच एकाच दिवशी बाराशेहून अधिक रुग्ण आढळले नाहीत. परंतु एकाच दिवशी 2107हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत रुग्णालयातून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या 14,682 इतकी झाली आहे.
पालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आज शहरात एकाच दिवशी 903 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 18 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानुसार शहरातील एकूण मृत्यू 349 तर शहराबाहेरील 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच डॅशबोर्डनुसार शहरातील 370 व शहराबाहेरील 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरात शनिवारी 870 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील 33 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 22,063 इतकी झाली आहे. महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 3856 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 303 रुग्णांचाही समावेश आहे.
पालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शनिवारी दिवसभरात 18 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 14 तर शहराबाहेरील 8 रुग्णांचा बळी गेला. शहरातील काळेवाडी, पिंपरी, निगडी, मोशी, मिंलिंदनगर, पिंपळे गुरव, चिंचवड, चिखली, वाल्हेकरवाडी, रहाटणी येथील 14 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये वाल्हेकरवाडी येथील 26 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. तर शहराबाहेरील खेडमधील तीन व विशालगड पुणे येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्हा रुग्णालयात एकाचा मृत्यू
सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी दापोडी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. तसेच आणखी 8 करोनाबाधितांची भर पडली आहे. सध्या 49 रुग्णांवर उपचार सुरू असून 20 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.