कोल्हापूर – गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांचे आणि शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन तोडल्याचा निषेधार्थ गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच कार्यकारी अभियंता यांच्या समोर डिझेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अचानक झालेल्या या घटनेने महावितरण कार्यालयात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, आक्रमक शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा ही प्रयत्न केला आहे. मात्र अधिकारी वीज तोडण्याचं समर्थन करताना पाहायला मिळाले. कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या महे, कसबा बीड, वाशी सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक होत वीज तोडण्याच्या निषेधार्थ महावितरणचे कार्यकारी अभियंता डी. एस. पाटील यांच्यासमोर डिझेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
खिशात असणारी काडीपेटी डिझेल मध्ये भिजल्याने आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी त्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र महावितरणचे अधिकारी आणि गावकरी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाली आहे. तब्बल तासभर हे सगळे शेतकरी अधिकाऱ्यांची वाट बघत डिझेलचा कॅन शेजारी घेऊन बसले होते. मात्र तरीही अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्यामुळे हा सर्व प्रकार चिघळला आणि एकच राडा झाला.