आपत्तीचे रुपांतर इष्टापत्तीत

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने करोना आपत्तीचे रुपांतर इष्टापत्तीत केल्याचे समोर आले आहे. “करोना सोबत जगताना काही काळजी घ्यावी’ याबाबतच्या महापौर, आयुक्तांसह विविध मान्यवरांच्या फेसबुक लाईव्हसाठी तब्बल 2 लाख 83 हजार रुपये मोजले आहेत. सात वेळा अर्ध्या तासासाठी असे केवळ साडेतीन तास फेसबुक लाईव्ह झाले आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी केल्याने करदात्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महापालिकेकडून करोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये राबविलेल्या जवळपास सर्वच उपाययोजना वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले. त्याची चौकशीही सुरु आहे. सॅनेटायजर खरेदीबाबतही मोठा गोंधळ झाला आहे. त्याबाबत देखील आरोप झाले आहेत. त्यातच करोना प्रतिबंधात्मक विषयांची माहिती फेसबुकद्वारे देण्यासाठी मे. डिझायर ग्राफिक्‍स या संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. हे प्रकरण देखील वादात सापडले आहे. या संस्थेला फेसबुक लाईव्ह, आणि करोना रुग्णांची विविध माहिती फेसबुकवर टाकण्यासाठी तब्बल 2 लाख 83 हजार 554 रुपये देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात एवढे पैसे खर्च करूनही फेसबुकद्वारे शहरवासियांची जनजागृती झालेली दिसून येत नाही.

जनजागृतीसाठी खर्च
माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण म्हणाले, करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मे. डिझायर ग्राफिक्‍स या संस्थेला काम देण्यात आले होते. फेसबुक पेजद्वारे आतापर्यंत अर्ध्या तासाचे सात लाईव्ह करण्यात आले आहेत. त्यासाठी या संस्थेला 2 लाख 83 हजार रुपये देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.