आपत्ती व्यवस्थापन कुठे दिसलेच नाही

नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया: मंडळांचे कार्यकर्ते व नागरिकच धावले मदतीला

कात्रज – बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढू लागल्यावर कात्रज, बालाजीनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी या परिसरातील नागरिकांना पुराची तीव्रता जाणवू लागली होती. अनेकांच्या घरातसुद्धा पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. अशावेळी काही नागरिकांनी परिसरातील लोकप्रतिनिधींना दूरध्वनी करून परिस्थितीची जाणीव करून दिली. या लोकप्रतिनिधींनी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला कळविले; पण प्रत्यक्षात पालिकेच्या अपत्ती व्यवस्थापनाचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी त्यावेळी आला नाही उलट अनेक ठिकाणचे कार्यकर्ते व नागरिकांनी एकमेकांना मदतीचा हात दिला. त्यामुळे पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन नक्की होते कुठे, असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

महापुरामुळे परिसरातील शेकडो घरांमध्ये सहा ते आठ फुटांपर्यंत पाणी शिरले होते. सर्व कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली संसार पाण्याबरोबर वाहून गेले. त्यादिवशी रात्रभर पाऊस कोसळत होता; पण मदतीचा हात प्रत्येक जण एकमेकांना देत होता.

भिलारेवाडी, मांगडेवाडी, कात्रज, बालाजीनगर, धनकवडी, राजमुद्रा सोसायटी, मोहननगर, काशिनाथ पाटीलनगर, पुण्याई नगर, राऊतबाग, नवीवसाहत, अशा भागांमध्ये बुधवारी रात्री पावसाच्या ओढ्याच्या आलेल्या महापुरामुळे आठ ते दहा फुटांपर्यंत पाणी होते. राष्ट्रशक्ती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काशिनाथ पाटील नगर व पुण्याईनगर येथील शंभर महिला व लहान बालके यांना सुरक्षितस्थळी हलविले त्याचबरोबर कै. काशिनाथ अनाजी धनकवडे प्राथमिक आरोग्य केंद्र, बालाजीनगर येथे त्यांच्या राहण्याची व भोजनाची सोय केली तर कात्रज येथील नवी वसाहत येथे जवळजवळ दोनशे ते अडीचशे कुटुंबातील महिला व बालके यांना कै. सुदामराव बाबर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर मदत करून त्यांना मोरे विद्यालयांमध्ये हलविले व त्यांची राहण्याची व खाण्याची सोय केली. प्रगती फाउंडेशनच्या वतीने नागरिकांना तातडीने नाश्‍ता व जेवणाची व्यवस्था केली तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध करून दिले. अशाप्रकारे सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्ते यांनी रात्रभर या संकट काळामध्ये सामान्य नागरिकांची मदत करून एक महत्त्वाचा संदेश दिला.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर घटना घडत असताना आपत्कालीन व्यवस्था दहा ते पंधरा मिनिटांत त्याठिकाणी पोहोचणे आवश्‍यक होते तशी आश्‍वासने सुद्धा मिळाली ;पण कोणीही आले नाही उलट काही अधिकाऱ्यांनी संकटकाळात असताना फोन उचलणेसुद्धा योग्य समजले नाही याचा राग येथील नागरिकांच्या मनात दिसून येत असून हा राग आता भेट देणाऱ्या मंत्री व आमदारांवर निघत आहे. नागरिक पालिकेला कर देत असतात अशावेळी त्यांनी कर्तव्य समजून मदतीला धावून येणे गरजेचे होते, पण का आले नाहीत? असा सवालसुद्धा नागरिक व्यक्त करत आहेत.

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन केला; मात्र कोणीही प्रतिसाद दिला नाही. पोलीस देखील फिरकले नाही. गणेशमंडळांचे तरुण कार्यकर्ते व नागरिक यांनी आमची सुटका केली. महिला व बालकांना ज्ञानेश प्रायमरी स्कूल व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राहण्याची व जेवणाची सोय केली हे जर मदतीसाठी आले नसते तर आज आम्हीसुद्धा वाहून गेलो असतो.
– अंजली भोकरे आपद्‌ग्रस्त महिला गुलमोहर सोसायटी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)