वॉशिंग्टन : अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच देशभरातील 50 राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत आपत्ती कायदा लागू करण्यात आला आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाने हैदोस घातला असतानाच अमेरिका जणू कोरोनाचे नवे केंद्र बनली आहे. अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या काही लाखांमध्ये असून आतापर्यंत या आजाराने 22 हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट आपत्ती कायदा लागू करण्यासंबंधी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी, ‘इतिहासात पहिल्यांदाच देशातील 50 राज्यांमध्ये संपूर्णपणे आपत्ती कायदा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कधीच न पाहिलेल्या शुत्रूशी युद्ध सुरू आहे. विजय नक्कीच आपला असेल.’ असे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे बेहाल झालेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली होती. भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो, असे ट्रम्प म्हणाले होते. परंतु, भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन अमेरिकेला पुरवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्वीट करून पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते. तसेच त्यांनी ट्वीटमध्ये भारत-अमेरिका यांच्यातील मैत्रीचाही उल्लेख केला होता.