नीरा -वाय यू केम हियर? व्हॉट हॅपेंड ? गेट लॉस्ट! गेट आउट फ्रॉम हिअर ! ऍन्ड डोन्ट केम हिअर अगेन ! असा सज्जड दम भरत गुळुंचे (ता. पुरंदर) येथील एकाने वैद्यकीय कर्मचारी बापू भंडलकर, तलाठी महाजन, पोलीस पाटील दीपक जाधव, आशा स्वयंसेविका मीनाक्षी निगडे यांना भरला. परगावहून आलेल्या व्यक्तीला क्वारंटाइन करण्यासाठी गेलेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना चक्क उच्च शिक्षित व्यक्तीने घराबाहेर काढले.
हा प्रसंग झाल्यानंतर समितीच्या सदस्यांनी संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी समितीचे अध्यक्ष व सरपंच संभाजी कुंभार यांच्याकडे दाद मागितली. मात्र, या व्यक्तीने उपसरपंच संतोष निगडे यांना फोन लावून सांगतो, असे म्हणताच सरपंच कुंभार यांनीही काढता पाय घेतला. काहीही अधिकार नसताना अशा व्यक्तीवर कारवाई कशी करावी, असे मत सदस्यांनी व्यक्त केले आहे.
समितीत वैद्यकीय कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी असतानाही आता क्वारंटाइन करण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर टाकली आहे. नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची जबाबदारी दीपक जाधव यांच्यावर सोपवून अंग झटकले आहेत.
मात्र, प्रत्यक्षात आज संबंधित व्यक्तीने नियमबाह्य काम करूनही त्याच्यावर कारवाई करण्याचे रीतसर पत्र देण्यास सरपंच कुंभार यांनी नकार दिला. उलटपक्षी समितीच्या जबाबदाऱ्या पोलीस पाटलांवर टाकून स्वतः नामानिराळे राहण्याची अजब युक्ती ग्रामसेवक जयेंद्र सूळ यांनी राबविली आहे.