विधानसभा अध्यक्ष पदावरून महाविकास आघाडीत मतभेद?

मुंबई – विधानसभा अध्यक्ष पदावरुन महाविकास आघाडीत मतभेद झाले आहेत का? असा प्रश्न पुन्हा उपस्थित करण्यात येत आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी कॉंग्रेसकडून केली जात आहे. अशातच शिवसेना आणि राष्ट्रवादी मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास अनुकूल नसल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अधिवेशनाच्या कामकाजाचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. अशातच 10 मार्च रोजी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कॉंग्रेसची अशी मागणी आहे की, या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात यावी. परंतु, अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर काही आमदारांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. परंतु, रिपोर्टस आले नसल्यामुळे हे आमदार उपस्थित राहू शकलेले नाहीत.

अशातच जर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली, तर किती आमदार उपस्थित राहू शकतील, हा मोठा प्रश्न आहे. त्याचसोबत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चा आणि तो मंजूर करुन घेणे हे सरकारचे प्राधान्य आहे. त्यामुळे तुर्तास अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अनुकूल नाहीत.

आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवरुन चर्चा झाली. या बैठकीत कॉंग्रेसने अध्यक्ष पदाची निवडणूक याच अधिवेशनात घ्यावी ही भूमिका मांडली आहे. परंतु, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले प्राधान्य सध्या अर्थसंकल्प मंजूर करुन घेणे असल्याचे सांगितले.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसकडे आहे. तसेच विरोधा पक्षांकडूनही रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदावरुन महाविकास आघाडी सरकारवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवरुन महाविकासआघाडीत एकमत होत नसल्याचे चित्र आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.