कर्नाटक भाजपमध्ये पुन्हा बेबनाव

बंगळुरू: कर्नाटकातील नाराज भाजप आमदारांनी बेलगावी येथे स्वतंत्र बैठक घेतल्याचे वृत्त नुकतेच थडकले आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही आमदारांची तातडीची बैठक बोलावल्याचे वृत्त आले होते. पण आपण अशी काही आमदारांची तातडीची बैठक बोलावलेली नाही, अशी माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली.

उत्तर कर्नाटकातील भाजपच्या नाराज आमदारांनी माजी खासदार रमेश कट्टी यांच्या बेलगावी जिल्ह्यातील गावी नुकतीच एक स्वतंत्र बैठक बोलावली होती. कर्नाटकातून राज्यसभेच्या चार जागांची निवडणूक लवकरच होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या नाराज आमदारांची ही स्वतंत्र बैठक तेथे गुरुवारी रात्री बोलावण्यात आली होती. या बैठकीला ज्या आमदारांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे त्या आमदारांनीही उपस्थिती दर्शवली होती.

दरम्यान, आपल्या निवासस्थानी काही भाजप आमदारांची बैठक झाल्याच्या वृत्ताला रमेश कट्टी यांचे बंधू आमदार उमेश कट्टी यांनी दुजोरा दिला. मात्र, त्या बैठकीशी राज्यसभा निवडणुकीशी काहीएक संबंध नव्हता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आमच्या बंधूंना राज्यसभेचे सदस्यत्व देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी या आधीच दर्शवली आहे ते आश्‍वासन ते पाळतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.