नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संभाव्य प्रवेशावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे चर्चेचा विषय बनलेली किशोर यांची कॉंग्रेसमधील एन्ट्री रखडली आहे. आता त्याविषयीचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हाती असल्याचे समजते.
किशोर यांनी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. तेव्हापासून त्यांच्या संभाव्य कॉंग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. त्या पक्षाकडून किशोर यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याच्या बातम्याही याआधी प्रसिद्ध झाल्या.
मात्र, किशोर यांच्या प्रवेशाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यांच्या प्रवेशाबाबत कॉंग्रेसने अद्याप जाहीर वाच्यता केलेली नाही. स्वत: किशोर यांनीही त्याविषयी चकार शब्द काढलेला नाही.
अशात कॉंग्रेसमधील मतभेदाची माहिती समोर आली आहे. किशोर यांना प्रवेश देण्याबाबत सोनियांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी सल्लामसलत केली. त्यातील काहींनी किशोर यांना पक्षात सामावून घेण्यावर आक्षेप घेतल्याचे समजते.
प्रामुख्याने असंतुष्ट मानला जाणारा 23 ज्येष्ठ नेत्यांचा गट किशोर यांना प्रवेश देण्यास अनुकूल नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. आता किशोर यांच्या संभाव्य प्रवेशाचा चेंडू अंतिम फैसल्यासाठी सोनियांच्या कोर्टात गेला आहे.