पिंपरी – औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमाचे वार्षिक परीक्षांचे निकाल मागील तीन महिन्यांपासून लागलेले नाहीत. त्यामुळे, अभ्यासक्रम पूर्ण करूनदेखील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले नसल्याने नोकरी मिळण्यास अडचण होत आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे मुलांसाठी तर कसारवाडी येथे मुलींसाठी आयटीआय संस्था चालवली जाते. या संस्थेत दरवर्षी शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मोरवाडी येथील संस्थेत वेल्डर, पेंटर जनरल, शिल्ड मेटल वर्क्स, ड्राफ्टसमन मेकॅनिकल, इलक्ट्रिॉनिक्स मेकॅनिक यासह विविध 14 प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. तर कासारवाडी येथे कॉम्प्युटर ऑपरेटिंग अँड प्रोग्राम असिस्टंट, डीटीपी, बेसिक कॉस्मेटॉलॉजी, हॉस्पिटल हाऊस कीपिंग, इलक्ट्रिनिक्स मेकॅनिक आणि फॅशन डिझाईन असे सहा प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवले जातात. मागील वर्षीपासून या सर्व अभ्यासक्रमासाठी वार्षिक परीक्षा घेण्यात येत आहे. त्यानुसार 2018-2019 सालामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा निकाल सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत परीक्षेचे निकालच जाहीर झालेले नाहीत.
या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये मागील वर्षी केंद्र सरकारने बदल केला होता. त्यानुसार, सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच वेळी घेऊन या परीक्षाचा निकाल नवी दिल्ली येथील प्रशिक्षण महासंचालक यांच्याकडून देण्यात येणार होता. मात्र, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर नवी दिल्ली येथील प्रशिक्षण महासंचालक कार्यालयाकडून विद्यार्थ्यांचे निकाल देण्यासाठी वेळ काढूपणा केला जात असल्याने विद्यार्थ्यांचे निकाल रखडले आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेऊनही त्यांना प्रमाणपत्र नसल्यामुळे नोकरी मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे, आता या महिन्यात तरी निकाल जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.