नादुरुस्त एसटी बस गाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय

ठोसेघर परिसरातील प्रकार विद्यार्थ्यांची परीक्षेच्या काळात तारांबळ

ठोसेघर – सातारा तालुक्‍यातील दुर्गम भागातील ठोसेघर परिसरातील चाळकेवाडी, चिखली चोरगेवाडी, जांभे, बामणेवाडी या गावांतील नागरिक आणि विद्यार्थ्यांना गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त एसटी बसमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा-ठोसेघर-जांभे दरम्यान येणाऱ्या एसटी बस वारंवार नादुरुस्त होवून बंद पडत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची ऐन परीक्षेच्या काळात तारांबळ उडत आहे.

सातारा तालुक्‍याच्या पश्‍चिमेकडील ठोसेघर परिसरातील दुर्गम भागातील छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांमधील नागरिक दळणवळणासाठी प्रामुख्याने एसटी बस सेवेवर विसंबून आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात एसटी महामंडळाकडून नादुरुस्त आणि जुन्या खिळखिळ्या अवस्थेतील बस गाड्या पाठवल्या जात आहेत. त्यामुळे वारंवार या गाड्या रस्त्यातच बंद पडत आहेत. या वारंवार बंद पडलेल्या गाड्यांची तात्पुरती दुरूस्ती करून पुन्हा त्याच गाड्या पुन्हा पाठवल्या जात आहेत.

यासर्व प्रकारामुळे ठोसेघर परिसरातील चाळकेवाडी, चिखली, चोरगेवाडी, जांभे, बामणेवाडी, मालदेव, जगमिन या दुर्गम भागातील गावांमधील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या काळात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, याआधी याच मार्गावर गजवडी येथे अशाच नादुरुस्त एसटी बसचा ब्रेक निकामी झाला होता. चालकाच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला होता. तर राजापुरी फाटा ते ठोसेघर दरम्यान असलेल्या रस्त्यावर एसटीचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये बसमधील प्रवासी किरकोळ तर काही गंभीर जखमी झाले होते. सातारा ठोसेघर मार्गावरील सज्जनगड घाट हा अतिशय धोकादायक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अशा प्रकारची एखादी दुर्घटना होण्याआधी एसटी महामंडळाकडून या भागात चांगल्या अवस्थेतील बस गाड्या सोडण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.