शिक्षण संचालक दिनकर पाटील यांची तडकाफडकी बदली

शिक्षण विभागात खळबळ : मुंबई बालभारती मुख्य कार्यालयाची जबाबदारी

पुणे – राज्य शासनाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांची मुंबई येथील बालभारतीच्या मुख्य कार्यालयात तडकाफडकी बदली केली आहे. दरम्यान, आता प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. या बदली आदेशाने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

 

अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालकपदी दिनकर पाटील काही वर्षे कार्यरत होते. दीड वर्षांपूर्वी त्यांची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकपदी बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याकडे मागील वर्षीपासून त्यांच्याकडे शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालकाचा अतिरिक्त कार्यभार होता. पाटील यांनी दोन्ही विभागांतील अनागोंदी कारभाराला लगाम घालून अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य दिले. कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी त्यांनी विशेष नियोजन करुन कायमस्वरुपी अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचनाही अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. कार्यालयात वेळेवर या अन् वेळेतच कामे मार्गी लावा. विनाकारण कोणाचीही कामे अडवू नका, असे म्हणत त्यांनी काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारीही मोडून काढली.

 

…म्हणून बदलीचा निर्णय

विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक मतदार संघातून दिनकर पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. दिनकर पाटील हे शिक्षण विभागातील दोन पदांवर कार्यरत असल्याने त्यांचा निवडणुकीतील शिक्षक मतदारांवर कोणताही प्रभाव पडू नये याची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने शासनाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पावले टाकली आहेत. त्यानुसार दिनकर पाटील यांना मूळ व प्रभारी या दोन्ही पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांची थेट मुंबईलाच बदली करण्याचा निर्णय शुक्रवारी (दि.13) घेण्यात आला. रात्री उशिरा गोपनीय पद्धतीने त्याबाबतचे आदेशही ई-मेलवर संबंधितांना पाठवण्यात आले आहेत.

 

विद्या प्राधिकरणाची सूत्रे आता द्विवेदी यांच्याकडे

शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) संचालक पदाचा दिनकर पाटील यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार संपुष्टात आणण्यात आला आहे. त्यांच्या ठिकाणी मुंबई येथील समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक राहूल द्विवेदी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. नियमित स्वरुपात पदावर अधिकारी रुजू होईपर्यंत अथवा शासनाने पुढील आदेश येईपर्यंत द्विवेदी यांच्याकडेच अतिरिक्त कार्यभार राहणार आहे, असे शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी आदेश जारी केले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.