पुणे – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) कारभारावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने टीका होत असते. आता मंडळाच्या संचालकपदी तब्बल दीड वर्षांनंतर पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने कारभाराला उत्तम शिस्त लागणार आहे.
बालभारती संचालकपदी कार्यरत सुनील मगर दीड वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांच्यानंतर पदाचा प्रभारी कार्यभार बड्या अधिकाऱ्यांनी सांभाळला. यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे व बालभारतीचे विवेक गोसावी यांचा समावेश होता.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांची 13 नोव्हेंबर 2020 रोजी बालभारतीच्या संचालकपदी तडकाफडकी बदली झाली. त्यांना मुंबई येथील कार्यालयातून कामकाज सांभाळण्याबाबतचे आदेश होते. विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दिनकर पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे मतदारांवर कोणताही प्रभाव पडू नये यादृष्टीने खबरदारी म्हणून दिनकर पाटील यांची बदली झाली.
आता निवडणूक झाली असून निकालही जाहीर झाला आहे. दरम्यान, दिनकर पाटील यांची बालभारती संचालकपदी केलेली बदली रद्द करून त्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकाच्या मूळ पदावरच नियुक्ती देणे अपेक्षित होते. मात्र शासनाने पाटील यांची बालभारतीच्या संचालकपदी झालेली बदलीच कायम ठेवली आहे.
बालभारतीच्या मुंबई ऐवजी पुण्यातील कार्यालयातून आपले दैनंदिन कामकाज करावे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी 8 डिसेंबर 2020 रोजी काढले आहेत. या आदेशाचे पालन करत पाटील यांनी पुणे कार्यालयातून कामकाजाला सुरुवात केली आहे.