पुणे – अग्रसेन महाराज सहकारी पतसंस्थेच्या संचालकास आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या संस्थेत तीन कोटी 41 लाख 87 हजाराचा अपहार झाला होता. याप्रकरणी 12/6/2020 रोजी पतसंस्थेच्या दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. संजय मानमचंद अग्रवाल असे संचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार खडकी येथील अग्रसेन महाराज सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांनी साल 2012 ते 2018 दरम्यान कर्ज वाटप प्रक्रियेत घोटाळा केला होता. त्यांनी पोटनियम बाह्य कर्ज वाटप करुन ते कायदेशीररीत्या वसूल न करता तसेच कर्जदारांची मालमत्ता संस्थेच्या नावावर तारण न घेता कर्जाचे वाटप केले.
यामुळे पतसंस्थेला 3 कोटी 41 लाख 77 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. पोलीस उपायुक्त (आर्थिक व सायबर सेल) भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुचेता खोकले, पोलीस अंमलदार नूतन जव्हेरी, वैजनाथ शिंदे, स्वप्नील गरड यांनी खडकी बाजार येथे सापळा रचून संजय अग्रवाल याला ताब्यात घेतले. दरम्यान याप्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी आपली माहिती देण्यासाठी पोलीस निरीक्षक सूचेता खोकले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.