युक्रेन- विमानाचे युक्रेनमधील कीव्ह विमानतळावर लँडिंग झाले होते. काही सोपस्कर व्हायचे असल्याने सगळे प्रवासी बसले होते. काहीजण उतरण्यासाठी मधल्या पॅसेजमध्ये उभे राहिले होते. त्यामुळे प्रवाशांना उकडत होते. गरम झाल्याने प्रवाशांची चिडचिड होणे स्वाभाविक होते.
परंतु आता लवकरच विमानातून उतरायचे आणि घरी जायचे या आशेने प्रवासी थोडासा त्रास सहन करत होते. पण एका प्रवासी महिलेला मात्र हे सगळे सहन झाले नाही. ती थेट विमानाच्या पंखावर गेली. काही प्रवाशांनी खिडकीतून बाहेर पाहिले तर त्यांना विमानाच्या पंखावर एक महिला दिसली.
दोन मुलांची आई असलेली ही महिला सुट्टी संपवून तुर्कस्तानातून परत आली होती. तिला असह्य उकडू लागल्याने तिने इमर्जन्सी एक्झिटचे बटन दाबले आणि आपत्कालिन स्थितीत वाचण्याचा दरवाजा उघडला गेला. त्याबरोबर ही महिला विमानाच्या मागच्या बाजूला असलेल्या दरवाजातून गारव्यासाठी विमानाच्या पंखावर गेली.
तुर्कस्तानहून आलेल्या बोईंग 737-86 एन विमानात हा प्रकार घडला. या प्रकाराचा व्हिडिओ विमानतळावरून काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये ही महिला विमानाच्या पंखावर अगदी सहजपणे फिरताना दिसत आहे.
ही घटना पाहणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, विमान लँड झाल्यावर सगळे प्रवासी उतरण्याच्या आधीच एक महिला विमानाच्या पंखावर चालत असल्याचे धक्कादायक दृश्य मला दिसले. तिची मुले मात्र विमानातच बसून होती. आपली आई विमानाच्या पंखावर फिरत असल्याचे पाहून त्यांनाही धक्का बसला. विमानातून त्यांनी पाहिल्यावर, ते जवळजवळ ओरडलेच. ही तर आमची आई आहे.
या घटनेनंतर पायलटने तातडीने पोलिस आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले. या प्रकारानंतर या महिलेला युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानांमधून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. एअरलाईन्सने अशी घटना घडल्याची पुष्टी केली आहे. तिच्या या धक्कादायक वागण्याचे नेमके कारण ती सांगू शकली नाही. विमानतळावर तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तिने मद्यपान केल्याचे किंवा ड्रग्ज घेतल्याचे आढळून आले नाही.