राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दिशाभुलीचे काम

आमदार गोरे यांनी घेतला विरोधकांचा समाचार

चाकण – खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे-नाशिक रेल्वे, पुणे-नाशिक रस्ता अशी अनेक कामे मंजूर केली आहेत. मात्र हीच कामे करण्याचे आश्‍वासन देऊन मतदारांची दिशाभूल करण्याचे काम राष्ट्रवादीचे उमेदवार करीत आहेत. अशा उमेदवाराला नेस्तनाबूत करा आणि आढळरावदादांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवा असे आवाहन आमदार सुरेश गोरे यांनी केले.

गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पान-पान जाहिराती वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत. या जाहिरातीत भविष्यात कोणती कामे करणार ते छापण्यात आले आहे. त्यात पुणे-नाशिक रस्त्याचे काम करणार असे म्हटले आहे. प्रत्यक्षात या रस्त्याच्या राजगुरुनगर ते सिन्नर रस्त्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत 20 टक्के कामापैकी नारायणगाव आणि खेड घाटाच्या बायपासचे काम सुरु झाले आहे. नाशिक फाटा ते चांडोली रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम मंजूर असून 2-3 महिन्यांत त्याचे भूमिपूजनही होईल.

पुणे-नाशिक रेल्वेचे कामही मंजूर असून लवकरच त्याचे भूसंपादन सुरु होणार आहे. मात्र राष्ट्रवादीचा उमेदवार हीच कामे आपण करणार असे सांगून जनतेची फसवणूक करतो आहे. निवडून यायचा पत्ता नाही आणि त्याआधीच आपण कामं केल्याचा फक्त अभिनय हे करीत आहेत. नाव शिवाजीमहाराजांचं घ्यायचं आणि खोटं बोलायचं, नाव संभाजीराजांचं घ्यायचं आणि राष्ट्रवादीच्या शाहिस्तेखानाला मदत करायची, हे लोकांच्या लक्षात येऊ लागल्यानेच त्यांना मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. येत्या 29 एप्रिलला शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतदार त्यांना “फक्त सिरीयलमध्ये कायम काम करायला पाठवून देणार आहेत’ असेही आमदार गोरे यांनी सांगितले.

गेली महिनाभर फक्त खोटे आणि खोटेच बोलणारा माणूस सच्चा मावळा तर असूच शकत नाही. मालिकेसाठी कर्ज घेतल्याचे सांगणाऱ्या कोल्हेंचे बिंग फुटल्यानंतर दिवसेंदिवस त्यांना मिळणारा प्रतिसाद कमी होत गेल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रचारातून काढता पाय घेतला. खासदार आढळराव पाटील यांचा विजय निश्‍चित झाला आहे. चाकणच्या सभेने शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे, असा आत्मविश्‍वास आमदार गोरे यांनी प्रकट केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.