मुंबई – सुशांत सिंह राजपूतच्या माजी व्यवस्थापक दिशा सालियन हीच्या मृत्यू प्रकरणातील फाईल्स डिलीट झाल्याच्या वृत्ताचे मुंबई पोलिसांनी खंडन केले आहे. दिशाच्या मृत्यूबाबतची कोणतीही फाईल डिलीट झाली नाही. त्याची सर्व नोंद आहे. त्याची कागदपत्रेही उपलब्ध आहेत, असे मालवणी पोलिसांच्या वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याबाबात अनेक जणांचे जबाब घेण्यात आले आहेत. मात्र तिच्या कुटुंबियांनी अद्याप कोणाविरूध्दही तक्रार नोंदवली नाही, असे या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
बिहार पोलिसांचे एक पथक मालवणी पोलिसांकडे शनिवारी (दि.1) गेले होते. त्यावेळी मालवणी पोलिसांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणाचे फोल्डर डिलीट केल्याचे सांगितल्याचे असे वृत्त प्रकाशीत झाले होते.
बिहार पोलिसांनी दिशाच्या घरालाही भेट दिली होती. मात्र त्यावेळी घरात कोणीही नव्हते. दिशा सालीयनचा मृत्यू तिच्या मालाडमधील 14 व्या मजल्यावरील घरातुन पडून मृत्यू झाला होता. सुरवातीला ही आत्महत्या असल्याचे वाटत होते, मात्र पोलिसांनी हा अपघाती मृत्यू असल्याचे सांगितले होते.