नगर – जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसह नऊ गावांतील रिक्त सरंपंचपदाच्या थेट जनतेतून निवडी होणार असून 275 ग्रामपंचायतच्या 403 सदस्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकाही होणार आहे.
या सर्व निवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील नऊ ठिकाणी विविध कारणांमुळे सरंपचांच्या रिक्त जागेसाठी थेट जनतेतून निवडी होणार असून इतर आठ ठिकाणच्या सार्वत्रिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांतही सरपंचपदाची निवड थेट जनतेतूनच होणार असल्याने याठिकाणी चुरस पाहायला मिळणार आहे.
संबंधीत ठिकाणी कालपासून आचारसंहिता लागू झाली असून या सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 19 ते 24 डिसेंबर 2019 या कालावधीत स्वीकारली जाणार आहेत.शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्विकारली जातील.त्यांची छाननी 26 डिसेंबर 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7ः30 ते सायंकाळी 5ः30 या वेळेत होईल.मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी होईल. मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी आता सुरु होत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सुमारे 800 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत.