- 80 लाखांचा खर्च
- प्रति किट 321 रूपये
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दवाखाने, रूग्णालये, ऑटो क्लस्टर करोना रूग्णालय तसेच अण्णासाहेब मगर क्रीडा संकुल येथील जम्बो कोविड सेंटर या ठिकाणी 25 हजार पीपीई कीट आणि एन 95 मास्क तसेच इतर साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेतील दुसऱ्या लघुत्तम निविदाधारकाकडून हे साहित्य थेट पद्धतीने खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी 80 लाख रूपये खर्च होणार आहे.
करोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत बाधीत रूग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र हिवाळ्यामध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. महापालिकेचे दवाखाने, रूग्णालये, ऑटो क्लस्टर करोना रूग्णालय, अण्णासाहेब मगर क्रीडा संकुल येथील जम्बो कोविड सेंटर या ठिकाणी करोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यासाठी 25 हजार पीपीई किट आणि एन 95 मास्क तसेच इतर साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. हे साहित्य तातडीने मिळण्यासाठी वैद्यकीय विभागामार्पत मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पीपीई किट आणि एन 95 मास्क खरेदी करण्यासाठी अल्पमुदतीची निविदा मागविण्यात आली होती.
या निविदा प्रक्रियेमध्ये पिंपरीतील ओमनी हेल्थ केअर यांनी प्रति किट 321 रूपये अधिक जीएसटी असा लघुत्तम दर सादर केला. या निविदा प्रक्रियेमध्ये पात्र झालले दुसरे लघुत्तम निविदाधारक सुपर प्लास्टीक कॉर्पोरेशन यांची निविदा स्वीकारण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्राप्त निविदा लघुत्तम दर 321 रूपये अधिक जीएसटी प्रति किटप्रमाणे 25 हजार पीपीई किट खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 80 लाख 25 हजार रूपये अधिक जीएसटी एवढा खर्च होणार आहे. त्यानुसार, त्यांच्यासमवेत करारनामा करून थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहे.