औंध, दि.23 (प्रतिनिधी) – बाणेर-बालेवाडी परिसराला अनधिकृत हॉटेल्सनी विळखा घातलेला आहे. त्यातच बालेवाडीतील हाय स्ट्रीट परिसर हॉटेलसाठी प्रसिद्ध आहे. तरुणाईचा वीकेंड साजरा करण्यासाठी या भागाकडे ओघ असतो. येथील अनधिकृत हॉटेल्सवर पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभाग-3 च्या वतीने कारवाई करण्यात आली. यात हॉटेलच्या टेरेसवरील व साइड मार्जिनमध्ये बांधण्यात आलेल्या वाढीव तब्बल 20 हजार स्क्वेअर फूट बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
पार्किंगच्या जागेत, तसेच टेरेसवर अनधिकृत शेड उभारण्यात आले होते. समोरील मोकळ्या जागेतही बांधकाम करण्यात आले होते. ते वाढीव बांधकाम अतिक्रमण विभागातर्फे काढून टाकण्यात आले. दरम्यान, बाणेर-बालेवाडी परिसरामध्ये असलेल्या टेरेस हॉटेलवर प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील अनाधिकृत हॉटेल व टेरेसवरील अनधिकृत बांधकामावर कारवाईचे मागणी स्थानिक नागरिक सातत्याने करत आहेत.
कनिष्ठ अभियंता गंगाप्रसाद दंडिमे यांनी सांगितले की, “सदर अतिक्रमण नोटीस पाठवल्या होत्या. सदर सर्व टेरेसवरील तसेच हॉटेलच्या पार्किंग परिसरातील बांधकामे अनाधिकृत आल्याने कारवाई केली आहे. इतर अनधिकृत हॉटेलवरदेखील पुढील काळात कारवाई केली जाणार आहे. सदर करावाई कार्यकारी अधिकारी श्रीकांत वायदंडे, उप अभियंता जयवंत पवार, गंगाप्रसाद दंडिमे, संग्राम पाटील, संदेश कुळवमोडे यांच्या उपस्थितीत झाली.’
बेशिस्त पार्किंगचा त्रास
हाय स्ट्रीट परिसरात हॉटेल व्यावसायिक पार्किंगसाठी राखीव जागांमध्ये संपूर्ण बांधकाम करत आहेत. त्यामुळे येथे येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यातच उभी करतात. तसेच हॉटेल व्यवसायिकदेखील पदपथावरच वॅलेट पार्किंगसाठी काउंटर लावत कर्मचारी उभे करतात. अशा हॉटेल्वर नियमितपणे कारवाई केल्यास परिसरातील बेशिस्त पार्किंगचा त्रास देखील कमी होईल, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.