महापालिका करणार गुन्हे दाखल
अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांचे आदेश
पुणे – शहरातील महापालिकेच्या मिळकती, स्वच्छतागृहे, उड्डाणपूल तसेच सार्वजनिक ठिकाणी जाहिरातीची पोस्टर आणि पत्रके चिटकविणे चांगलेच महागात पडणार आहे. अशा जाहिरातदारावर थेट विद्रुपीकरणाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांनी प्रशासनास दिले आहेत. “स्वच्छ सर्वेक्षण 2020′ स्पर्धेसाठी महापालिकेकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्याची पाहणी करण्यासाठी रविवारी गोयल यांनी अधिकाऱ्यांसह कर्वेनगर भागाची पाहणी केली. यावेळी पालिकेने सुशोभीकरण केलेल्या अनेक सार्वजनिक ठिकाणी अशा जाहिरातींचे पोस्टर लावल्याचे समोर आले.
महापालिकेकडून शहर स्वच्छतेसह सार्वजनिक भिंती, उड्डाणपूल, महापालिकेची स्वच्छतागृहे, बसथांबे, पथदिवे, रस्ते दुभाजक स्वच्छ केले असून त्यावर स्वच्छता संदेश तसेच रंगरंगोटी केली आहे. मात्र, काही उपद्रवींकडून या स्वच्छता केलेल्या ठिकाणी तसेच रंगरंगोटीच्या जागेवर आपल्या व्यवसायाच्या जाहिराती चिटकविण्यात येतात. तसेच, त्याचे प्रमाणही एवढे मोठे असते की त्या काढण्यासाठी पालिकेस दरवर्षी जवळपास 1 कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो.
रविवारीही गोयल हे कर्वेनगर भागात पाहणी करत असताना या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलाखाली ज्या ठिकाणी रंगरंगोटी करून स्वच्छता संदेश देण्यात आले होते त्यावर रूम भाड्याने देणे आहे, बॅंक लोन अशा जाहिराती लावल्या होत्या. त्यामुळे गोयल यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत जाहिरातीत असलेले संबंधित व्यक्तींच्या मोबाइलवर संपर्क साधून त्यांना समज देण्यासह त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.