छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीने लोणीकंद पोलीस स्टेशन येथे साजरा केला ‘दीपोत्सव सोहळा’

पुणे – दरवर्षी दीपावलीनिमित्ताने एक दिवा शंभूराजांच्या चरणी याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ (श्री क्षेत्र तुळापूर) येथे भव्य शंभुशौर्य दीपोत्सव सोहळा छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीकडून साजरा केला जातो.
सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या युवक आणि युवतींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

मात्र या वर्षी वेगळ्या पद्धतीने दिपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. करोना च्या संकटकाळात आपण सर्वजण सुरक्षित राहावे म्हणून अहोरात्र आपल्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध असलेल्या पोलीस बांधवांनी खऱ्या अर्थाने उल्लेखनीय सेवा केली आहे. पोलीस बांधवांच्या कर्तव्याचे स्मरण म्हणून लोणीकंद पोलीस स्टेशन येथे यंदाचा दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

वास्तविक पाहता छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या रयतेचे सदैव रक्षण केलेलं आहे व पोलीस बांधव आपल्यासाठी सदैव तीच भूमिका पार पाडतात. आपले सण उत्सव असो वा सांस्कृतिक कार्यक्रम ते आपल्यासाठी सतत झटतात त्यामुळे त्यांच्या समवेत हा उत्सव साजरा करावा असा मानस छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीने ठेवला.

त्याचबरोबर छत्रपती शिवराय आणि वारकरी संप्रदाय यांचा फार जवळून संबंध राहिलेला आहे आषाढी वारी पालखी सोहळ्याला एकेकाळी छत्रपती संभाजी महाराजांनी देखील अभय दिलेलं आहे हे सर्वश्रुत आहे, भक्ती आणि शक्तीचा संगम व्हावा या हेतूने यंदाचा दीपोत्सव हा वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींच्या समवेत व्हावा असा निश्चय समितीने केला होता.

त्याच भावनेतून यंदा भक्ती शक्ती संघ आळंदी देवाची यांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील, ह.भ.प.अविनाश धनवे पाटील, ह.भ.प.संग्रामबापू महाराज भंडारे आदिकरून सर्व उपस्थित होते.

याप्रसंगी पोलीस प्रशासनातील बांधवाना “शंभुशौर्य कोरोना योद्धा” हा पुरस्कार देण्यात आला.
लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर साहेब व पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे प्रवक्ते सुदर्शन शिंदे म्हणाले, ” आपण छत्रपती शिवरायांच्या काळातील स्वराज्य प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं नाही पण पोलीस बांधवरुपी मावळे आपले कायम संरक्षण करत असतात , यंदाचा दीपोत्सव साजरा करताना त्यांच्याबद्दल मनात असलेली आदर भावना व त्यांच्या बद्दल असणार ऋण व्यक्त व्हावं म्हणून हा दीपोत्सव आम्ही लोणीकंद पोलीस स्टेशन येथे साजरा केला.

या दरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे असलेले तुळापूर गावाचे मा सरपंच संतोष शिवले, केसनंद गावाचे पोलीस पाटील पंडीत हरगुडे पाटील यांनी दिवाळी निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

लोणीकंद पोलीस स्टेशन येथे शंभुशौर्य दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन सेवा समितीच्या वतीने प्रवीण झाम्बरे, राहुल आबा हरगुडे, प्रेम मोहिते, लक्ष्मण कोलते, सूरज आवारे व महेश लावंड यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.