लखनौ – उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या दोन जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. या भाजपने आझमगडमध्ये समाजवादी पक्षाला शह देण्यासाठी भोजपुरी चित्रपट अभिनेता दिनेश लाल यादव निरहुआ यांना उमेदवारी दिली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीतही निरहुआ यांनी याच जागेवरून निवडणूक लढवली होती. परंतु अखिलेश यादव यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. ते पुन्हा मैदानात उतरले आहे. तर भाजपने रामपूर लोकसभा मतदार संघात घनश्याम लोधी यांना उमेदवारी दिली आहे. घनश्याम लोधी हे सपाचे विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
आझमगड लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीसाठी सपा माजी खासदार बलिहारी बाबू यांचा मुलगा सुशील आनंद यांना उमेदवारी देऊ शकते. मात्र, शुक्रवारी पक्षाने यासाठी कोणालाही फॉर्म बी दिलेला नाही. मात्र हायकमांडने सुशील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे.
दरम्यान सपाने या जागेवर डिंपल यादव किंवा रमाकांत यादव यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू होती. मात्र रमाकांत यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने बदललेली राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी पक्षनेतृत्वासमोर येथून दलित उमेदवार उभा करण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचे सांगण्यात येत आहे.
यामध्ये बलिहारी बाबू यांचा मुलगा सुशील याचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. बलिहारी हे BAMCEF चे वरिष्ठ अधिकारी आहेत. पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल असे सांगितले आहे.