पंढरपूर : दीपावलीच्या सुट्या अन् कार्तिकी सोहळा 12 नोव्हेंबर रोजी आहे. पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये गर्दी वाढली आहे. भक्तिसागर असलेल्या 65 एकर परिसरात दिंड्या येण्यास सुरुवात झाली आहे. येथील फलाट नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. 65 एकर परिसरात मूलभूत सुविधा पुरवण्यात येत आहेत. 1800 स्वयंसेवक भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सज्ज आहेत.
कार्तिकी यात्रा 12 नोव्हेंबर रोजी साजरी होत असून यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरपालिका, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, आचारसंहितेमुळे येत्या कार्तिक यात्रेला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. कार्तिक वारीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यात येते.
लाखभर भाविकांनी घेतले स्वामींचे दर्शन
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात सलग सुट्यामुळे मंगळवारी सकाळपासुनच भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. दिवाळीच्या सलग सुट्यामुळे भाविकांची गर्दी झाली. रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनरांग दोन किलोमीटरपर्यंत गेली होती. ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ ‘सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय’ या जयघोषाने वटवृक्ष मंदिर परिसर दुमदुमला होता.