#Wari2019 : सोमेश्वरनगरीत बालदिंडी व रिंगण सोहळा उत्साहात संपन्न

बारामती (सोमेश्वर) – पुणे व विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडियम सीबीएसी स्कूलच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांची वारी, रिंगण सोहळा व पालखीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. दिंडी म्हणजे काय, दिंडीची परंपरा, वारकरी संप्रदाय याविषयीची माहिती मुलांना व्हावी या उद्देशाने आषाढी वारीनिमित्त आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी शाळेत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बालचमूंनी वारकऱ्यांचा वेश परिधान करुन हातात भगव्या झेंड्याबरोबरच जनजागृतीपर घोषणा देत सोमेश्वर करंजेपूल ते सोमेश्वर साखर कारखाना असा दिंडीचा टप्पा पार केल्यानंतर कारखान्याच्या मैदानात विद्यार्थ्यांनी गोल रिंगण केले . बालक स्वरुपातील विठोबा व रुक्मिणी, डोक्यावर मंगल कलश व तुळस घेतलेल्या नऊवारी साडी परिधान केलेल्या मुली तसेच धोतर-टोपी-पांढरा शर्ट, कपाळी गंध-बुक्का, हाती भगवी पताका घेतलेल्या मुलांची ही दिंडी लक्ष वेधून घेत होती.

विद्यार्थ्यांच्या या दिंडी सोहळ्यात शिक्षक पालक व काही ग्रामस्थही सहभागी झाले होते. तेथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी मार्गदर्शन केले, तर वर्षा निगडे व सह शिक्षकांनी या सोहळ्यासाठी नियोजन केले. अशा कार्यक्रमातून मुलांना आपल्या संस्कृतीची, परंपरांची माहिती व्हावी, त्याविषयी त्यांच्या मनात आदर निर्माण व्हावा, यासाठी दिंडीचा उपक्रम आयोजित केल्याचे शाळेतील शिक्षकांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.