विविधा: दीनानाथ दलाल

माधव विद्वांस

वाङ्‌मयीन पुस्तकांतील बोधचित्रांकरिता, मुखपृष्ठांकरिता ख्यातनाम झालेले चित्रकार दीनानाथ दलाल यांची आज जयंती. त्यांचा जन्म गोव्यातील मडगावजवळील कोंब येथे 30 मे 1916 रोजी झाला. मडगावच्या शाळेत शिकत असतानाच त्यांनी मुख्याध्यापकांचे चित्र हुबेहूब रेखाटून त्यांची शाबासकी मिळविली होती. कलेची जाण असलेल्या मुख्याध्यापकांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या वडिलांना मोठ्या आग्रहपूर्वक सांगितले की, मुलाला चित्रकलेच्या शिक्षणासाठी मुंबईला पाठवावे. त्यांच्या घरातील वातावरण धार्मिकवृत्तीचे होते.

गोव्यातील निसर्गरम्य परिसरात त्यांचे बालपण गेल्याने चित्रकलेसाठी लागणारी सौंदर्यदृष्टी बालपणीच त्यांच्यात विकसित झाली होती. कोकणीसह पोर्तुगीज, इंग्रजी, मराठी या भाषेतही त्यांनी प्रावीण्य मिळविले होते. शालेय शिक्षणानंतर त्यांनी मुंबई येथे केतकर आर्टस इन्स्टिट्यूटमध्ये चित्रकलेचे शिक्षण सुरू केले. पुढे त्यांनी वर्ष 1937 मध्ये सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून पदविका (जी. डी. आर्ट) मिळविली. 1937 मध्ये जी. डी. आर्ट ही परीक्षा उत्तीर्ण होताच त्यांची व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात झाली. दलालांनी मामा वरेरकर यांच्या “वैमानिक हल्ला’ या पुस्तकासाठी पहिल्यांदाच मुखपृष्ठ केले.

सुरुवातीस दलाल 1938 च्या सुमारास बा. द. सातोस्कर यांच्या सागर प्रकाशनासाठी काम करू लागले. त्यानंतर त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध बी. पी. सामंत आणि कंपनी या जाहिरात वितरण संस्थेत नोकरी धरली. वर्ष 1944 मध्ये “दलाल आर्ट स्टुडिओ’ची स्थापना करून त्यांनी मराठी प्रकाशनविश्‍वात पुस्तकांची मुखपृष्ठे, अंतरंगचित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. पुस्तकातील विषयानुरूप साजेसे आकर्षक मुखपृष्ठ ही काळाची गरज होती. त्यामुळे मराठी पुस्तकांचा चेहरामोहरा बदलू लागला आणि प्रकाशनविश्‍वात “दलाल-पर्व’ सुरू झाले. ते उत्तम व्यंगचित्रही काढत असत. शिवराज्याभिषेकाच्या तैलचित्राने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. गोट्या, चिंगी, अंतू बर्वा ही त्यांची व्यक्‍तिचित्रे खूपच गाजली. दीनानाथ दलाल स्वतः साहित्यप्रेमी होते.

दलाल आर्ट स्टुडिओच्या माध्यमातून डोंगरे बालामृत, धूतपापेश्‍वर, कोटा टाइल्स, वर्तकी तपकीर, कॅम्लिन, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स अशा कंपन्यांच्या जाहिराती आणि दिनदर्शिका दलालांनी तयार केल्या होत्या. दि गोवा हिंदू असोसिएशनच्या कलाविभागाचे 1965 ते 1970 या काळात ते मार्गदर्शक होते. तसेच टॉम अँड बे या जाहिरात वितरण कंपनीचे सल्लागार होते. भारतातील विविध चित्रप्रदर्शनांत त्यांचा सहभाग असे. दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात 13 वेळा दलालांची चित्रे पुरस्कारप्राप्त ठरली. गोवा, हैदराबाद, अमृतसर येथील प्रदर्शनांमध्येही त्यांच्या चित्रांना पुरस्कार मिळाले. दलालांनी प्रा. अनंत काणेकर आणि मो. ग. रांगणेकर या साहित्यिक-पत्रकार मित्रांच्या चित्रा साप्ताहिकासाठी राजकीय परिस्थितीवर आणि ब्रिटिशांच्या धोरणांवर टीका करणारी व्यंग्यचित्रे काढली. अशा या कलंदर चित्रकाराचे 15 जानेवारी 1971 रोजी मुंबई येथे निधन झाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×