मुंबई – हिंदी सिनेसृष्टीतील अभिनयाचा मानदंड, असंख्या सुपरहिट सिनेमांचे नायक आणि आजही चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव झेलणारे दिलीपकुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांचे छायाचित्र फेसबुकवर पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. वर्ष 1922 मध्ये जन्म झालेले दिलीपकुमार सध्या 97 वयाचे असून लवकरच ते वयाची शंभरी गाठतील, असा विश्वास चाहते व्यक्त करत आहेत. समाज माध्यमांमध्ये अनेकदा त्यांच्या निधनाच्या अफवा उठल्या. मात्र, वाढते वय आणि हालचाल करण्यावरील मर्यादा याला पुरून उरलेला हा अभिनेता आजही हसतमुख जीवन जगतो आहे, हे पाहून अनेकांना प्रेरणा मिळते.
वर्ष 1944 मध्ये “ज्वार भाटा’ या सिनेमापासून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केलेल्या दिलीपकुमार यांनी “देवदास’, “मधुमती’, “गंगा-जमुना’, “नया दौर’, “मुघल-ए-आझम’, “राम और शाम’, “दाग’, “आझाद’, “कर्मा’, “शक्ती’, “विधाता,’ “मशाल’, “सौदागर’ आणि “मजदूर’ अशा अनेक सिनेमांतील भूमिकांतून आपला ठसा उमटवला आहे.
https://www.facebook.com/154163638088995/posts/1694193620752648/
हिंदी सिनेसृष्टीतील अभिनयाचे विद्यापीठ म्हणून गणले जाणारे दिलीपकुमार म्हणजे बोलका अभिनय, खर्जातला आवाज, संवादफेक आणि त्यामधील विराम (पॉझेस) यासह भूमिकेचे सोने करण्याची क्षमता यामुळे विख्यात होते. “दिग्दर्शकाचा अभिनेता’ हे नामाभिधान त्यांनी अनेकदा सार्थ ठरवले. तसेच आठपेक्षा अधिकवेळा त्यांनी प्रतिष्ठेचे फिल्मफेअर ऍवॉर्डही जिंकले.
अमिताभ बच्चन असो की शाहरुख खान, आजवरच्या सर्वच सुपरस्टार्सनी दिलीपकुमार यांचे मोठेपण मान्यच केले आहे. शिवाय अमिताभ आणि शाहरुख हे दिलीपकुमार यांच्या परंपरेमधले (स्कूल) अभिनेते मानले जातात. फेसबुकच्या निमित्ताने दिलीपकुमार यांच्याबरोबरचे छायाचित्र सायरा बानू यांनी शेअर केल्याने अनेक चाहत्यांनी ही पोस्ट शेअर केली असून आपल्या आवडत्या अभिनेत्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.