मंचर – राज्याचे गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे-पाटील यांची निवड झाल्याबद्दल आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंचर येथे फटाके फोडून पेढे वाटून सोमवारी सायंकाळी आनंद व्यक्त केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. गेली सात टर्म आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व विद्यमान मंत्री दिलीप वळसे-पाटील करीत आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू म्हणून दिलीप वळसे-पाटील राज्याला परिचित आहे. आतापर्यंत मंत्री वळसे-पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष, ऊर्जा, उच्च तंत्र, वैद्यकीय शिक्षणमंत्री, अर्थमंत्री इत्यादी महत्त्वाची पदे भूषवून या खात्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
सध्या विद्यमान मंत्रिमंडळात कामगार आणि उत्पादनशुल्क मंत्री मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची वर्णी लागणार असे संकेत मिळत होते. त्या दृष्टीने कार्यकर्ते आनंदात जल्लोष करण्यासाठी सज्ज झाले होते.
मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, मंचरचे उपसरपंच युवराज बाणखेले, शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुहास बाणखेले, बॅंकेचे संचालक दत्ता थोरात, संजय बाणखेले, राजाबाबू थोरात, नाना थोरात, संजय काळे, ग्रामपंचायत सदस्य माणिक गावडे, ज्योती निघोट, कविता थोरात यांच्यासह विविध मान्यवर, कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या निरगुडसर गावी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.