मंचर- मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षांची सभा गुरुवारी (दि. 3) सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील घोडेगाव येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील सलग सहा वेळा विजयी झाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा सुमारे 59 हजार मतांनी पराभव झाला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना सुमारे 25 हजार मतांचे मताधिक्य आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघातून मिळाले आहे. त्या मताधिक्याचे आणि विजयाचे शिल्पकार वळसे पाटील ठरले. गेल्या 30 वर्षांत वळसे पाटील यांनी रचनात्मक विकासकामे केली असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे युवक नेते मानसिंग पाचुंदकर आणि कॉंग्रेसचेआंबेगाव तालुकाध्यक्ष राजू इनामदार यांनी दिली. मंचर येथील बाजार समितीच्या आवारात आयोजित सभेत खासदार डॉ. अमोल कोल्हे मार्गदर्शन करणार आहेत.