दरी कधी सांधलीच नाही

हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सुपरस्टार्सबद्दल जेव्हा बोलले जाते, तेव्हा डोळ्यासमोर सर्वप्रथम जे नाव येते, ते दिलीप कुमार यांचे. अर्थात त्यांच्या काळात दिलीप- देव- राज हे त्रिकुट होते. तिघेही स्टार होते. त्यांचा प्रत्येकाचा मोठा चाहता वर्ग होता. सुपरस्टार ही संज्ञा तेव्हा अस्तित्वात नव्हती. ती नंतर आली. मात्र तिघांवर प्रेक्षकांनी प्रेम केले. मात्र तरीही प्रत्येकाची वेगळी अशी एक ओळख होती. मोहम्मद युसूफ खान नावाने दाखल झालेल्या एका उमद्या, देखण्या तरूणाने स्वत:ची ओळख प्रस्थापित तर केलीच पण दिर्घकाळ चित्रपट सृष्टीवर राज्य केले.

दिलीप कुमार हे एक विद्यापीठच. अभिनयाचे बेताज बादशाह, ट्रॅजिडी किंग वगैरे अनेक विशेषणे त्यांना लावली गेली. मात्र तरीही ती तोकडीच ठरली, त्याला कारण त्यांचे कर्तृत्व. अभिनयाची बाराखडी गिरवणाऱ्या नवोदीतापासून ते सध्या सर्वोच्च स्थानावर असलेल्या किंग, बादशाह, परफेक्‍शनीस्ट पर्यंत आजचा कोणताही स्टार दिलीप साहब यांचे अनुकरण केल्याशिवाय पुढे जाउच शकत नाही. किंबहुना त्यांनी जे काही केले, दाखवले त्याचा ठसा चित्रपटसृष्टीवर असा काही उमटला आहे की पुढची अनेक शतके तो तसाच कायम राहणार आहे.

कलाकार मोठा असला अथवा सुपरस्टार असला म्हणजे सगळे त्याला मिळाले असतेच असे नाही. आयुष्यात काही कटू प्रसंगांचा त्यांनाही सामना करावा लागला असतो. कुठेतरी त्यांनीही वेदना सोसल्या असतात काही गमावलेले असते. प्रेमभंगाचे दु:खही अनुभवले असते. दिलीप कुमार यांच्याबाबतीतही काही वेगळे घडले नाही. त्यांचे नाव समोर आले की त्या नावासोबतच आणखी एक नाव सहजपणे ओठांवर येते….मधुबाला!

चित्रपटसृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्न अन लाभलेले अभूतपूर्व वरदान म्हणजे मधुबाला. त्यांचे सौंदर्य आणि हास्य यांनी जी रेषा आखून दिली आहे ती आजपर्यंतच्या त्यांच्यानंतर आलेल्या एकाही नायिकेला ओलांडताच आली नाही. सौंदर्य ही इश्‍वराची देणगी वरदान असते. मात्र तो अभिनय, ते हास्य आणि तो निरागसपणा…मधुबाला खऱ्या अर्थाने गर्भश्रीमंत होत्या.

ज्वार भाटा हा दिलीपजींचा पहिला चित्रपट. खरेतर त्याच चित्रपटात मधुबालाही झळकायच्या. मात्र ते झाले नाही. त्यानंतर तब्बल सात वर्षांनी या दोघांची भेट झाली ती थेट तराना चित्रपटाच्या सेटवर. तो 1951 चा काळ. त्यावेळी मधुबाला होत्या केवळ 18 वर्षांच्या. मात्र दिलीप साहब त्यांना आवडलेले. असे म्हणतात, मधुबालांनी आपल्या हेअर ड्रेसरकडे एक चिठ्ठी आणि गुलाबाचे फुल दिले. दिलीप कुमार यांना देण्यासाठी. उर्दूत लिहिलेल्या त्या चिठ्ठीत म्हटले होते की तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर याचा स्वीकार करावा. दिलीप कुमार चकित झाले. बहुदा वेगळ्याच काही भावनाही त्यावेळी त्यांना जाणवल्या असाव्यात. मात्र त्यांनी फुल स्वीकारले. त्यानंतर मायानगरीतल्या या दोन महान कलाकारांची एक वेगळीच प्रेमकथा वास्तविक जिवनात फुलण्यास सुरूवात झाली.

1952 मध्ये त्यांचा संगदील आला. तोपर्यंत दोघांच्या प्रेमाचा गंध सगळीकडे दरवळला होता. लवकरच दोघे विवाहाच्या बंधनात अडकणार अशा चर्चाही सुरू झाल्या. काहींनी तर यांची एंगेजमेंट-सगाई किंवा साखरपुडा झाला असल्याचा दावाही केला. पन्नासच्या दशकाचा सुरूवातीचा काळ हा दोघांसाठी सुवर्णकाळ होता. विशेषत: मधुबाला यांच्यासाठी. सुंदर, निरागस चेहरा आणि असंख्य मोत्यांची उधळण करणारे ते मोहक हास्य. त्यावेळी मधुबाला या सौंदर्याच्या सगळ्या फुटपट्ट्या आणि मापदंडाच्या पलिकडे गेल्या होत्या.

दिलीप कुमार काहीसे अंतर्मुख, मितभाषी, क्वचित प्रसंगी आपल्याच जगात रमणारे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर काहीसे बुजरे लाजाळू व्यक्तीमत्व. मात्र मधुबाला यांच्या प्रेमात ती ताकद होती की त्यांनी या अभिनयाच्या सम्राटालाही आपल्या कोषातून बाहेर आणले. मुक्त, प्रसन्न आणि उत्साह व चैतन्याने परिपूर्ण अशा मधुबाला हुशार तर होत्याच पण एखाद्या गोष्टीसाठी प्रेरित करणाऱ्याही होत्या अशा आशयाचे विधान दिलीप कुमार यांनी त्यांच्या चरित्रात केले आहे.

या दोघांच्या जिवनात किंव्हा एकुणच हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मुघले आझम हा चित्रपट मैलाचा दगड मानला जातो. भारतीय चित्रपटसृष्टीची श्रीमंती, कलासक्ती, गीत-संगिताचे ऐश्‍वर्य, अभिनयाची उंची कुठेच हा चित्रपट उणा नव्हता. सगळ्या दिग्गज, तपस्वी, रथी-महारथींचे या चित्रपटाच्या निर्मितीत हात लागले होते. चित्रपटाला सुरूवात झाली तेव्हा दिलीपजी आणि मधुबाला प्रेमात होते. मात्र हा चित्रपट प्रदीर्घ काळ चालला. त्या दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी गेले होते.

दोघांचे मार्ग बदलले होते. मात्र तरीही त्याचा चित्रपटावर अथवा चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीवर किंचितही प्रभाव जाणवला नाही हे शंभरवेळा ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे, तेही मान्य करतील. दहा वर्षे लागलीत चित्रपट पूर्ण व्हायला. त्या काळात या दोघांच्या प्रेमकथेतही एक खलनायक होता. त्याचे नाव होते अताउल्ला खान. तो मधुबाला यांचा पिता होता.

दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रात त्यांनी याचा उल्लेख केला आहे. त्यात दिलीप कुमार आणि अताउल्ला खान यांच्यातील इगो कदाचित या प्रेमकथेचा शेवट करण्यास कारणीभूत ठरले असल्याचे प्रतीत होते.

खान यांना दिलीपजींसोबत एक चित्रपट करायचा होता. त्यांनी नकार दिला. हा नकार त्यांनी कसा घेतला हे त्यांचे त्यांनाच माहित. मात्र त्यानंतर दिलीप कुमार अताउल्ला खान यांच्या गुडबुकमध्ये राहिले नाहीत. मधुबाला यांचा दिलीप कुमार यांच्याशी विवाह त्यांना मान्य होण्यासारखाच नव्हता. हे एक कारण. पण त्याकाळच्या लोकांनी ज्या आठवणी मांडल्या आहेत, त्यातही कुठेतरी मधुबाला यांची कमाई आणि संपत्ती हाही त्यांच्या आणि दिलीपजींच्या प्रेमातला मोठा अडसर होता असे सूचित झालेले दिसते.

विभक्त झाल्यानंतरही निर्मात्यांना या दोघांना पडद्यावर एकत्र आणण्यात स्वारस्य होते. नया दौर या प्रचंड लोकप्रीय ठरलेल्या चित्रपटात मधुबाला यांचीच नायिका म्हणून वर्णी लागलेली. मात्र पित्याच्या विरोधामुळे त्यांनी या चित्रपटातून बाहेर पडणेच श्रेयस्कर समजले. दुर्दैवाने ही सगळी घडामोड न्यायालयात गेली. अताउल्ला खान यांनी निर्मात्यावर खटला दाखल केला व त्याला निर्माते बी. आर. चोप्रा यांनीही प्रत्युत्तर दिले. हा एकुणच प्रकार अत्यंत लांछनास्पद ठरला. कारण सुनावणीच्या काळात दिलीप- मधुबाला यांचे खासगी संबंधही पुरावे म्हणून सादर केले गेले. एका नको असलेल्या गोष्टीवर अनावश्‍यक व गलिच्छपणे प्रकाशझोत टाकला गेला.

आपल्या पित्याची अवज्ञा व्हावी हे मधुबाला यांनाही मान्य नव्हते. दिलीप कुमार यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी कुठेतरी त्यांची अपेक्षा होती. ज्यास दिलीप कुमार यांनी नकार दिला. त्यातून निर्माण झालेली दरी कधी सांधलीच गेली नाही.

नंतर दिलीप कुमार यांच्या लग्नाची बातमी समजल्यावर मधुबाला हताश झाल्या. त्यांनीही आहे ते स्वीकारत जिवनात आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अकालीच त्यांनी जगाचा निरोपही घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर दिलीप कुमारही बराच काळ नैराश्‍यात होते. कुठेतरी प्रेमाचे ते अविस्मरणीय क्षण आणि त्या आठवणी जिवंत होत्या. त्यांच्या आयुष्यात त्या सौंदर्यदेवतेचे स्थान कायम होते. ते कधीच रिक्त होणार नव्हते, नसावे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.